मित्राला वाचवायला गेला, त्याचाच जीव गेला; आत्महत्येसाठी गेलेला मित्र रेल्वे येताच बाजूला झाला अन्…

पुण्यात मैत्रिणीवरून आणि भागीदारीत असलेल्या कॅफेच्या आर्थिक कारणावरून दोन मित्रांचे भांडण झाले. या वेळी एका मित्राने रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या करणार असल्याचा बनाव केला. त्यामुळे दुसरा मित्र त्याला वाचविण्यासाठी लोहमार्गावर गेला. मात्र, रेल्वे येताच आत्महत्येचा प्रयत्न करणारा मित्र बाजूला झाला आणि वाचविण्यासाठी गेलेल्या मित्राचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला. ही घटना 3 एप्रिल रोजी पहाटे पावणेचारच्या सुमारास आकुर्डी रेल्वे स्थानकाजवळ घडली.

गणेश विठ्ठल लाड (रा. बारामती) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. गणेश याचे वडील विठ्ठल किसन लाड (वय 53) यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अभिजित गणेश गोळे (वय 25, रा. भोसरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश लाड आणि अभिजित गोळे हे मित्र होते. गणेश याच्या मैत्रिणीवरून आणि त्या दोघांमध्ये भागीदारीत असलेल्या कॅफेच्या आर्थिक कारणावरून त्यांच्यात वाद झाले. त्यावरून अभिजितने रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या करणार असल्याचा बनाव केला. तो रावेत येथे आकुर्डी रेल्वे स्थानकाजवळ लोहमार्गावर गेला.

मित्र आत्महत्या करत असल्याने त्याला वाचवण्यासाठी गणेश गेला. अभिजित लोहमार्गावर असल्याने त्याला बाजूला करण्यासाठी गणेश देखील लोहमार्गावरून जात होता. याचवेळी रेल्वे आली असता अभिजित अचानक ट्रॅकवरून बाजूला झाला आणि गणेश रेल्वेखाली चिरडला गेला. जखमी गणेश याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल न करता अभिजित पळून गेला. यामध्ये गणेश याचा मृत्यू झाला. फौजदार राहुल खिळे तपास करीत आहेत.

Comments are closed.