'हा' भारतीय खेळाडू म्हणजे दुसरा ॲडम गिलख्रिस्ट! ऑस्ट्रेलियन दिग्गजाने दिली मोठी प्रतिक्रिया
चेन्नई सुपर किंग्जचे (CSK) माजी फलंदाजी प्रशिक्षक मायकल हसी (Michael Hussey) यांनी जागतिक क्रिकेटमधील दुसरा ‘अॅडम गिलख्रिस्ट’ (Adam Gilchrist) मानल्या जाणाऱ्या फलंदाजाबद्दल वक्तव्य केले आहे. मायकेल हसी यांनी भारताचा 14 वर्षीय फलंदाज वैभव सूर्यवंशीची (Vaibhav Suryavanshi) तुलना गिलख्रिस्टशी केली आहे. टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने वैभव सूर्यवंशीच्या फलंदाजीचे कौतुक केले आहे.
मायकल हसी (Michael Hussey) म्हणाले, “गिलख्रिस्ट फलंदाजी करण्यासाठी आला तेव्हा संपूर्ण ऑस्ट्रेलियन संघ खेळ पाहण्यासाठी बाल्कनीत यायचा, कारण असे खेळाडू खूप रोमांचक असतात. या तरुण खेळाडूला पाहिल्यानंतर मलाही असेच वाटले. त्याला 35 चेंडूत शतक झळकावताना पाहणे आश्चर्यकारक होते. त्याचे आणि यशस्वी जयस्वालचे एकत्र फलंदाजी करणे आश्चर्यकारक होते. कधीकधी ते निष्काळजी वाटते, परंतु ते पाहणे खूप रोमांचक असते. काही सर्वोत्तम गोलंदाजांविरुद्ध असे खेळणे तुमचे मन उडवून टाकते.”
14 वर्षीय वैभव सूर्यवंशीने, आक्रमक फलंदाजीने सर्वांचे लक्ष्य वेधून घेतले. तो आयपीएलमध्ये शतक करणारा सर्वात तरुण फलंदाज ठरला आणि त्याने असा डाव खेळला जो क्रिकेटप्रेमींना वर्षानुवर्षे लक्षात राहील. त्यासमोर सामन्याचा निकाल निरर्थक ठरला. त्याच्या खेळीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने गुजरात टायटन्सला 8 विकेट्सने धूळ चारली.
राजस्थान रॉयल्सने विजयासाठी 210 धावांचे लक्ष्य 25 चेंडू शिल्लक असताना गाठले. आयपीएल सुरू झाल्यानंतर 3 वर्षांनी म्हणजेच 2011 मध्ये जन्मलेल्या बिहारच्या समस्तीपूर येथील सूर्यवंशीने आयपीएलमध्ये 35 चेंडूत शतक झळकावले जे ख्रिस गेलच्या (RCB) 30 चेंडूंच्या खेळीनंतर आयपीएलमधील दुसरे सर्वात जलद शतक आहे. या दमदार शतकी खेळीनंतर वैभव सूर्यवंशीने अनेक मोठ्या विक्रमांना गवसणी घातली.
Comments are closed.