कश्मीरमधील दहशतवादाला केंद्रीय गृहमंत्रीच जबाबदार, संजय राऊत यांची अमित शहांसह पंतप्रधानांवर टीका
ज्या देशात युद्धजन्य परिस्थिती असते, युद्धाची तयारी सुरू असते त्या देशाचे पंतप्रधान राजधानीबाहेर टंगळमंगळ करत फिरत नाहीत. कश्मीरमध्ये एवढे मोठे हत्याकांड झाले असताना आपल्या देशाचे पंतप्रधान विविध कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. हास्यविनोद करत आहेत. त्यांच्या वर्तनातून युद्धाला सामोरे जायचे आहे, पाकिस्तानला धडा शिकवायचा आहे असे काही दिसत नाही, अशी घणाघाती टीका शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केली. गेल्या दहा वर्षांत जम्मू-कश्मीरमध्ये झालेल्या हत्याकांड आणि दहशतवादी हल्ल्यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांनी या घटनेची जबाबदारी स्वीकारत राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.
खासदार संजय राऊत शनिवारी पुण्यात आले असता माध्यमांनी त्याच्यांशी संवाद साधला. ते म्हणाले, पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात 27 जणांचा बळी गेला. या घटनेनंतर आपले पंतप्रधान बिहारमध्ये प्रचाराला गेले. पाकिस्तानला धडा शिकवू, अशी घोषणा केली. त्यानंतर मुंबईत येऊन नऊ तास नटनटय़ांसोबत मजेत वेळ घालवला. गौतम अदानी यांच्या एका बंदराच्या उद्घाटनालाही गेले. त्यांची गळाभेट घेत मैत्री दाखवली. त्यानंतर आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्यासोबत हास्यविनोद करताना दिसले. त्यांना दुखवटा, राष्ट्रीय शोक आहे की नाही, सामान्य माणसाच्या जिवाला काही किंमत आहे की नाही, असा सवालही त्यांनी केला.
…तसे त्यांनी दहशतवाद्यांना चुन चुन कर मारावे
दहशतवाद्यांना धडा शिकवा, अशी भूमिका विरोधी पक्षांनी घेतली आहे. मात्र युद्धाची भाषा कोणी केली आहे, घरात घुसून मारू, ही भाषा कोणाची आहे? देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीच ही भाषा केली आहे. गृहमंत्री अमित शहा म्हणाले, चुन चुन कर मारेंगे. ते फक्त घोषणा करत आहेत. कृती करण्यापासून त्यांना कोणी रोखले आहे, असा संतप्त सवाल करत विरोधी पक्षातील नेत्यांना चुन चुन कर मारतात, त्यांना खतम करता तसे त्यांनी पाकिस्तानी दहशतवाद्यांना चुन चुन कर मारावे, असे खासदार संजय राऊत म्हणाले.
भाजप नेते, मंत्र्यांच्या चेहऱयावर दुखाचा लवलेशही दिसला नाही
एखाद्या माजी नेत्याचे निधन झाले तरी तीन दिवस दुखवटा असतो. परदेशी माजी राष्ट्राध्यक्षांचे निधन झाले तरी देशात दुखवटा असतो. राष्ट्रध्वज अर्ध्यावर खाली उतरवण्यात येतो. सर्व सरकारी कार्यक्रम रद्द करण्यात येतात. 27 जणांच्या मृत्यूचे दुŠख केवढे मोठे आहे. मात्र भाजप नेते पिंवा त्यांच्या मंत्र्यांच्या चेहऱयावर त्याचा लवलेशही दिसत नाही. पुलवामा हत्याकांड आणि आता पहलगाम हल्ल्यानंतर भाजप किंवा त्यांच्या नेत्यांच्या, केंद्रीय मंत्र्यांच्या कोणाच्याही चेहऱयावर आपल्याला दु:खाचा, चिंतेचा लवलेशही दिसला नाही, असा हल्लाबोल खासदार संजय राऊत यांनी केला.
जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठीच जातीनिहाय जनगणनेची घोषणा
जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी सरकारने जातीनिहाय जनगणनेची घोषणा केली आहे. जातीनिहाय जनगणनेला आमचा पाठिंबा आहे. त्याला विरोध करण्याचे कारण नाही. जातनिहाय जनगणनेची घोषणा करत सरकारने हेडलाईन दिली, पण याची डेडलाईन दिलेली नाही. ही जनगणना कधी सुरू करणार हे सांगा, असे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे. त्यामुळे पहलगाम हल्ल्याच्या गंभीर विषयापासून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठीच ही घोषणा करण्यात आली असल्याचे दिसून येत असल्याचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले. राज्य संघटक वसंत मोरे, शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे या वेळी उपस्थित होते.
Comments are closed.