एमएमआरडीएला मराठीचे वावडे, एल्फिन्स्टन पूल परिसरात लावलेल्या इंग्रजी फलकांबद्दल नागरिकांमध्ये नाराजी

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरही महायुती सरकारच्या अखत्यारीतील मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) मात्र आजही मराठीचे वावडे असल्याचे समोर आले आहे. एल्फिन्स्टन पूल पाडण्यात येणार असल्याने पर्यायी मार्गांची माहिती देणारे फलक एमएमआरडीएने लावले आहेत. ते सर्व फलक इंग्रजी भाषेत असल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
शिवडी-वरळी कनेक्टर प्रकल्पांतर्गत नवीन डबल-डेकर उड्डाणपुलासाठी मार्ग मोकळा करण्यासाठी एल्फिन्स्टन पूल पाडण्यात येणार आहे. त्यामुळे तो मार्ग किमान दोन वर्षे बंद राहण्याची शक्यता आहे. स्थानिक रहिवाशांच्या विरोधामुळे पूल पाडण्याची प्रक्रिया तात्पुरती थांबवण्यात आली असली तरी दादर पूर्वेपासून प्रभादेवी, करी रोडपर्यंत एमएमआरडीएने पर्यायी मार्गांची माहिती देणारे इंग्रजी भाषेतील फलक लावले आहेत.
दादर पूर्वचा उड्डाणपूल, कामगार नेते गणपत जाधव ऊर्फ मडके बुवा चौक (केईएम रुग्णालयाकडे जाण्याच्या मार्गावर), एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकाकडे जाणारा सिग्नल तसेच प्रभादेवी येथील संत रोहिदास चौक येथील सिग्नल आदी ठिकाणी हे फलक लावण्यात आले आहेत.
Comments are closed.