Gulabrao Deokar and Satish Patil join NCP in the presence of Ajit Pawar


– प्रेमानंद बच्छाव

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे जळगाव जिल्ह्यातील नेते आणि माजी राज्यमंत्री गुलाबराव देवकर व सतीश पाटील यांनी आज (03 मे) पक्षाला सोडचिठ्ठी देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या दोघांनी 2024 ची विधानसभा निवडणूक अनुक्रमे जळगाव ग्रामीण आणि एरंडोलमधून लढवली होती. याशिवाय माजी आमदार कैलास पाटील, दिलीप पाटील, शरद पाटील यांनीही राष्ट्रवादीचा झेंडा हातात घेतला. या पक्ष प्रवेशाने उत्तर महाराष्ट्रात शरद पवार गटाला धक्का बसला आहे. (Gulabrao Deokar and Satish Patil join NCP in the presence of Ajit Pawar)

चर्चगेट येथील के. सी. महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी बोलताना अजित पवार यांनी, बेरजेचे राजकारण करत आपण सर्व जाती धर्माच्या घटकांना सोबत घेऊन काम करुया, असे सांगताना सभासद नोंदणीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राज्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून उभा करण्याचे आवाहन केले.

हेही वाचा – Ajit Pawar : कर्जमाफीच्या प्रश्नावर अजितदादा भडकले; पत्रकारालाच म्हणाले, तू उद्या मुख्यमंत्री झाला तरी…

आम्ही राजकारणात किंवा सार्वजनिक जीवनात जात-पात, धर्म कधी पाळला नाही. अठरापगड जातींना घेऊन शिवरायांनी जसे राज्य केले, त्याच पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काम करत आहे, असेही पवार यावेळी म्हणाले. तुम्हाला शिवसेना चालत असेल तर भाजप का चालत नाही? असा सवाल करत अजित पवार यांनी शरद पवार गटावर निशाणा साधला. गेल्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जेवढे आमदार होते, त्यांनी सरकारमध्ये सहभागी व्हावे असे ठरले होते, याचा पुनरुच्चारही त्यांनी केला. तर, उभ्या महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी सज्ज होऊया, असे आवाहन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी यावेळी केले. खान्देशाचा विकास सर्वांना सोबत घेऊन करायचा आहे. भविष्यात हा विकास पक्षाच्यावतीने करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, शरद पवार गटाच्या उत्तर विभागीय अध्यक्षा तिलोत्तमाताई पाटील यांच्यासह जळगाव, धुळे, नंदुरबार, रावेर येथील जिल्हा परिषद, जिल्हा बँकेचे संचालक, पंचायत समिती, बाजार समितीच्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही अजित पवार गटात प्रवेश केला. यावेळी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, माजी मंत्री अनिल भाईदास पाटील, आमदार शिवाजीराव गर्जे, आमदार अमोल मिटकरी, सुरेखाताई ठाकरे, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव आदी उपस्थित होते.

हेही वाचा – Jayant Patil : अजितदादांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा; प्रतिक्रिया देताना जयंत पाटलांनी राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणावरही भाष्य केलं


Edited By Rohit Patil



Source link

Comments are closed.