Sanjay Raut criticism of Chandrashekhar Bawankule statement about splitting Congress


काँग्रेस फोडा, रिकामी करा, असे आदेश भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षातील कार्यकर्त्यांना दिले आहेत. ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बावनकुळेंच्या या विधानाचा समाचार घेतला असून त्यांनी सडकून टीका केली आहे.

मुंबई : काँग्रेस पार्टी जेवढी तुम्ही कमी कराल, तेवढा तुमचा राजकीय फायदा आहे. माझे काय होईल याची काळजी अजिबात करू नका, देवेंद्रजी आहेत, मी आहे, आम्ही न्याय देणार, असे सांगत काँग्रेस फोडा, रिकामी करा, असे आदेशच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षातील कार्यकर्त्यांना दिले आहेत. त्यांच्या या विधानानंतर काँग्रेस नेते आक्रमक झाले आहेत. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सुद्धा बावनकुळेंवर सडकून टीका केली आहे. भाजपा हा आता उपऱ्यांचा पक्ष आहे. त्यामुळे बावनकुळेंना थोडी जरी लाज असती तर त्यांनी असे विधान केले नसते, अशा शब्दात राऊतांनी फटकारले आहे. (Sanjay Raut criticism of Chandrashekhar Bawankule statement about splitting Congress)

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सोमवारी (ता. 5 मे) प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसबाबत केलेल्या विधानाची विचारणा करण्यात आली. याबाबत खासदार राऊत म्हणाले की, गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन आणि एकनाथ खडसे यांनी राज्यामध्ये भाजपा वाढवली आहे. तर, लालकृष्ण अडवाणी आणि सोबत अटल बिहारी वाजपेयी यांनी देशात भाजपा वाढवली आहे. पण हे जे आता बावनकुळे आणि अन्य मंडळी आहे, यांनी सत्तेचा आणि पैशाचा मदमस्त वापर करून, इतर पक्ष फोडून आपल्या पक्षाला सूज आणली. आजची भाजपा ही ओरिजीनल भाजपा नाही. इतरांचे पक्ष फोडले, सर्व भ्रष्टाचाऱ्यांना आपल्यासोबत घेतले आणि आपला पक्ष वाढवला. पण उद्या ज्यावेळी यांच्याकडे सत्ता नसेल, तेव्हा यांची सूज उतरलेली असले, असा टोला राऊतांनी लगावला.

हेही वाचा… Rahul Gandhi on Congress : 80च्या दशकात घडलेले चुकीचेच, राहुल गांधींनी स्वीकारली पक्षाच्या चुकांची जबाबदारी

तसेच, चंद्रशेखर बावनकुळे हे भाजपाचे राज्याचे अध्यक्ष आहेत. ते मंत्री आहेत. त्यांना थोडीशी जरी लाज वाटली असती, तरी त्यांनी काँग्रेस फोडा… अमूक फोडा.. हे विधान केले नसते. तुमचा पक्ष विचारधारेवर वाढवा. तुमची विचारधारा काय आहे, त्या विचारधारेवर यांनी पक्ष वाढवावा. कारण त्याबाबत आमचे काहीही म्हणणे नाही. आजचा महाराष्ट्रातील भाजपा हा 70 टक्के उपऱ्यांचा पक्ष आहे. त्यांच्या मंत्रिमंडळातील लोक पाहिले तर त्यामधील मूळ लोक ही बाजूलाच आहेत. त्यांनी विधान परिषदेवर ज्यांना घेतले आहे किंवा विधानसभेत ज्यांना तिकिट देऊन निवडून आणले, त्यातील 70 ते 75 टक्के लोक हे बाहेरचे लोक आहेत. त्यांचा भाजपाच्या विचारधारेशी काहीही संबंध नाही. या लोकांनी मोदींवर, वीर सावरकरांवर, संघावर टीका केली आहे. या सर्वांना घेऊन हे भाजपा वाढवत आहेत, त्यामुळे त्यांना लाज वाटली पाहिजे, असे सुनावत राऊतांनी बावनकुळे यांच्या विधानाचा समाचार घेतला आहे.



Source link

Comments are closed.