Rahul Gandhi Meet PM Modi : राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला ABP Majha
नवी दिल्ली: काँग्रेस नेते आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी (राहुल गांधी) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधान यांच्या निवासस्थानी राहुल गांधी आणि देशाचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी (नरेंद्र मोदी) यांच्यासमवेत बैठक संपन्न झाली. एकीकडे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावग्रस्त परिस्थितीने देशात गतिमान हालचाली आहेत. त्यातच, आज विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि सीजेआय यांनी पंतप्रधान महोदयांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
राहुल गांधी आज पंतप्रधान मोदींची भेट घेणार असल्याची माहिती होती. सीबीआयच्या प्रमुखपदी निवड करण्यासंदर्भात ही भेट होती, अशी माहिती समोर आली आहे. 14 मे 2025 रोजी सीबीआय प्रमुख प्रवीण सूद यांचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान, लोकसभा विरोधी पक्षनेते आणि सरन्यायाधीश यांची बैठक संपन्न झाल्याचे समजते. नव्या सीबीआय प्रमुखांच्या निवडीवर या बैठकीत शिक्कामोर्तब होईल.
दरम्यान, पहलगाम हल्ल्यानंतर भारताकडून पाकिस्तानसोबत व्यापार आणि आर्थिक व्यवहारांवरुन एकप्रकारे युद्धच सुरू झालं आहे. भारताने पाकिस्तानी नागरिकांना देशातून हाकलून दिलं असून पाकिस्तानसोबतच्या जल सिंधु करारावरही बंधने घातली आहेत. दुसरीकडे तिनही सीम दलाच्या प्रमुखांशी पंतप्रधान मोदींच्या सातत्याने बैठका होत आहेत. त्यामुळे, आजच्या या बैठकीत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीवरही चर्चा होऊ शकते. या चर्चेतून मोठा निर्णय केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण, विरोधी पक्षनेते व सरन्यायाधीश यांना सोबत घेऊन पंतप्रधान मोठा निर्णय घेऊ शकतात.
Comments are closed.