कोपर स्थानकातील सरकत्या जिन्याचा झाला सांगाडा, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, महिलांना मनस्ताप

कोपर परिसरातील रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेला ‘सरकता जिना’ गेल्या दोन वर्षांपासून वापरातच नाही. मशिनरीला गंज चढला असून केबल धूळ खात आहेत. वापर नसल्यामुळे सरकत्या जिन्याचा भंगार सांगाडा झाला आहे. तिकीट खिडकीजवळ अर्धवट स्थितीत प्लास्टिकच्या आवरणात जिन्याचा सांगाडा उभा करून ठेवला आहे. त्या ठिकाणी अक्षरशः धुळीचे साम्राज्य पसरले आहे. रेल्वे प्रशासनाच्या बेफिकिरीमुळे दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, महिलांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
कोरोना काळात रेल्वे प्रशासनाने सरकता जिना कोपर स्थानकाच्या बाजूला असलेल्या गार्डनमध्ये आणून ठेवला. दोन वर्षे याच अवस्थेत हा जिना पडून होता. यानंतर 2023 मध्ये कोपर स्थानकातील पश्चिमेच्या तिकीट खिडकीजवळ हा सरकता जिना आणून बसवला. मात्र तो अर्धवट स्थितीतच आजतागायत आहे. एस्कलेटर सुरू करण्याबाबत नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी करूनही रेल्वे प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे. केवळ दिखाव्यासाठी हा सांगाडा उभा करून ठेवण्यात आला आहे. प्रत्यक्षात तो आजतागायत सुरू झालेला नाही. परिणामी, कोपर पश्चिम परिसरातून पूर्व दिशेला तसेच फलाटावर जाणाऱ्या प्रवाशांना मोठ्या अडथळ्याचा सामना करावा लागत आहे.
रेल्वे प्रशासन ढिम्म
‘सरकता जिना बंद असल्यामुळे प्रवाशांना पायऱ्या चढत प्रवास करावा लागतो. ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती, गर्भवती महिला व दिव्यांग प्रवाशांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. मात्र याचे रेल्वे प्रशासनाला काहीच सोयरसुतक नसल्याचा संताप प्रवासी छोटेलाल चौरसिया यांनी व्यक्त केला.
मी दिव्यांग आहे. सरकता जिना बंद असल्यामुळे मला जिना चढून जाणे शक्य नव्हते. मागील आठवड्यात मला प्लॅटफॉर्म क्रमांक एकवरून दोनवर जाण्यासाठी ट्रेनमधून पलीकडे जावे लागले. मात्र टीसीने पकडून मला दंड आकारला. हा दंड सरकता जिना बंद असल्यामुळे मला भरावा लागला. – प्रणाली कानडे, प्रवासी
Comments are closed.