पंतप्रधान मोदींनी भाजपचे नव्हे तर देशाचे सरकार चालवावे, संजय राऊत यांचे आवाहन
गेल्या दहा वर्षात देशात जे अराजक निर्माण झाले आहे त्यासाठी गृहमंत्री अमित शहा जबाबदार आहेत असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाचे सरकार चालवावे भाजपचे नव्हे असे आवाहनही संजय राऊत यांनी केले आहे.
मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले की, भारत पाकिस्तानचं युध्द झालंच त्यापेक्षाही मोठं युद्ध आपण लढलो ते म्हणजे कोरोनाविरोधातलं. भारताची जनता ही मानसिकदृष्ट्या मजबूत आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये जनतेला मानसिकदृष्ट्या अडकवून ठेवलेलं आहे. अनेक देशांत आम्ही पाहिलेलं आहे की एखाद्या देशावर किंवा एखाद्या स्थळावर हल्ला झाला तर ताबडतोब 24 तासांत बदला घेतला जातो. आता आमचा युद्ध सराव होईल. म्हणजे आम्हाला बंदुका देणार आहात का? भोंगे वाजणार आहे, ब्लॅकआऊट होणार आहे, महत्त्वाच्या वास्तू झाकून ठेवल्या जातील. 1971 साली हे आम्ही पाहिलेलं आहे. याची विविध माध्यमातून लोकांना माहिती दिली जाऊ शकते. पण जशा थाळ्या वाजवल्या, टाळ्या वाजवल्या, तसं आता युद्ध सरावात आणखी काही दिवस घालवतील. आता आमच्या सैन्याचा युद्ध सराव सुरू आहे. सैन्य नेहमी सज्ज असायला हवं, ते आहे. आता आमचा प्रश्न आहे संरक्षण मंत्री, पंतप्रधान आणि तिनही दलांच्या प्रमुख राष्ट्रपतींना. त्यांना हे माहित आहे की नाही हेच मला माहित नाही. देश युद्ध करतोय हे राष्ट्रपतींना माहित आहे की नाही याबाबत माझ्याकडे माहिती नाही. आमचे पंतप्रधान मोदींना आवाहन आहे की भारत पाकिस्तान दरम्यान जो तणाव आहे, त्याचा भारताला आर्थिकदृष्ट्या फटका बसू शकतो. पण देश आणि जनता राष्ट्राच्या सुरक्षेसाठी आणि अभिमानासाठी कोणत्याही परिस्थितीशी सामना करायला तयार आहे. हा देश सदैव लढायला तयार आहे. तुम्ही मॉक ड्रील घ्या पण तुम्ही दाखवा काय करत आहात. पाकिस्तानात संसदेचे विशेष अधिवेशन भरलं आहे. आमची पहिल्या दिवसापासून मागणी आहे की, कश्मीरच्या प्रश्नावर तुम्ही दोन दिवसांचं संसदेच विशेष अधिवेशन घ्यायला पाहिजे. आणि सगळ्यांशी मनमोकळेपणाने चर्चा केली पाहिजे. सर्वपक्षीय बैठकीत जसं होतं तसे नाही. आम्हाला उणी दुणी काढायची नाहीत. आम्ही सरकारसोबत, देशासोबत आहोत पक्षासोबत नाही. हा देश जेवढा तुमचा आहे तेवढाच आमचाही आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार करताना एकदा काय ते आरपार होऊन जाऊ द्या. किती दिवस टांगती तलवार ठेवणार आहात असेही संजय राऊत म्हणाले.
तसेच युद्धानतंर जी परिस्थिती निर्माण होईल त्यासाठी तुम्ही आतापासून या देशातल्या सर्व पक्षांना विश्वासात घेऊन काम केलं पाहिजे. युद्ध करणं सोपं असतं पण युद्धानंतर जी परिस्थिती निर्माण होते ती भयानक असते. युक्रेन,अफगाणिस्तान, इराणमध्ये झालेल्या युद्धानंतर त्या देशांना अनेक अडचणीना तोंड द्यावं लागलं. त्यासाठी तुम्ही देशातल्या समस्त राजकीय पक्ष, विरोधी पक्षांना बरोबर घेऊन काम करणं गरजेचं आहे. पण हे सगळं करण्याआधी देशाचे गृहमंत्री अमित शहा जे अपयशी गृहमंत्री आहेत त्यांना पुढची परिस्थिती सांभाळता येणार नाही. हे मी परत सांगतोय, त्यांना पदावरून हटवायला पाहिजे. गेल्या दहा वर्षात देशात जी परिस्थिती निर्माण झाली आहे, जे अराजक निर्माण झाले आहे त्यासाठी गृहमंत्री अमित शहा जबाबदार आहेत. सरकारमध्ये लल्लू पंजू बसले आहे, तुमचे चमचे बसले आहेत, युद्धानंतर जी परिस्थिती निर्माण होईल ती परिस्थिती तुमच्या नेत्यांकडून सावरता येणार नाही. त्यासाठी तुम्हाला राष्ट्रीय सरकार बनवावं लागेल. पाकिस्तान ज्या प्रकारे धमकी देतंय, ज्या पद्धतीने चीनने पाकिस्तानला पाठिंबा दिला आहे. रशिया आणि जपान आपल्यापासून खूप दूर आहे, चीन आपल्या सीमेवर आहे आणि चीन आपला शत्रू राष्ट्र आहे. दोन शत्रू एकत्र आले आहेत आणि ही परिस्थिती सांभाळून घेण्यासाठी पंतप्रधानांनी भाजपचे नव्हे तर देशाचे सरकार चालवावे. त्यासाठी त्यांना सरकारमध्ये बदल करावे लागतील. कारस्थानी असलेल्या गृहमंत्र्यांना हटवावं लागेल असे संजय राऊत म्हणाले.
युद्धानतंर जी परिस्थिती निर्माण होईल त्याचा सामना आपण कसा करणार यावरही चर्चा झाली पाहिजे. पण याबाबात काहीच हालचाली होताना दिसत नाहियेत. फक्त युद्ध लढायचंय आणि निवडणुका जिंकायच्या आहेत हा त्यांचा वन पॉईंट अजेंडा आहे. पहलगामध्ये जो हल्ला झाला त्याची गुप्तहेर खात्याने याबाबात माहिती दिली होती. तरीही तिथे कुठल्याही प्रकारे सुरक्षा व्यवस्था नव्हती. यासाठी गृहमंत्री अमित शहा जबाबदार आहेत. देश सुरक्षित ठेवायचा असेल तर अमित शहा यांचा राजीनाना घ्यावा. पुलवामातही हेच झालं आणि पहलगाममध्येही हेच झालं होतं. अशी व्यक्ती गृहमंत्री पदावर का आहे? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीची मला पूर्ण माहिती आहे. पण मी आता जर तुम्हाला काही सांगितलं तर हे युद्धाबाबात जे काही बोललो त्याबाबत गांभीर्य कमी होईल आणि त्यावर पाणी पडेल. मी एक दोन दिवसांत त्या बैठकीविषयी, महाराष्ट्राचे अस्वस्थ आणि अशांत उपमुख्यमंत्री यांच्याविषयी काय निर्णय झाला आहे ही सांगेन असेही संजय राऊत म्हणाले.
Comments are closed.