अवकाळी पाऊस-गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान, मात्र पंचनाम्याचे आदेश देण्यास सरकारला फुरसत नाही – विजय वडेट्टीवार

अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालं आहे. मात्र सरकारला पंचनामे करण्याचे आदेश देण्यासाठी फुरसत नाही, अशी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर केली आहे. महाराष्ट्रातील अनेक भागांत वादळी वाऱ्यासह गारपीट झाली असून अवकाळी पावसामुळे शेतीच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यातच नागपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सरकारवर टीका केली आहे.

विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत की, “अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे हजारो हेक्टर शेती आता संकटात सापडली आहे. रब्बी पीक पूर्ण उद्ध्वस्त झालं आहे. यात मक्याचे, उन्हाळी धानाचे पीक आणि फळभाज्यांचे नुकसान झाले आहे. काही भागात केळीचे नुकसान झाल्याची माहिती आहे. मात्र अद्यापही या निद्रावस्थेमध्ये असलेल्या सरकारला पंचनामे करण्याचे आदेश देण्याची फुर्सत नाही. केवळ आपसात स्पर्धा करून एकमेकांची जिरवण्यामध्ये यांचा वेळ जातोय का, असा प्रश्न निर्माण होत आहे. आतापर्यंत पंचनामे करून सरकारने मदतीची घोषणा करण्याची अपेक्षा होती.”

सरकारवर हल्लाबोल करताना वडेट्टीवार म्हणाले, “तुम्ही (महायुती) शेतकऱ्यांची कर्जमाफी करतो म्हणून आश्वसन देऊन सरकारमध्ये आला आणि आता तुम्ही शेतकऱ्यांशी बेईमानी केली. शेतकऱ्यांची फसवणूक केली. अवकाळीमुळे आणि गारपीटीमुळे झालेलं नुकसान, याचीही तुम्ही भरपाई देऊ शकत नाही, म्हणजे तुमचं शेतकऱ्यांप्रती किती प्रेम आणि आस्था आहे, हे दिसून आलं आहे. शेतकऱ्यांच्या जीवावर मते घ्यायची आणि शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडायचं, एवढं पाप आणि इतकं पापी सरकार महाराष्ट्राच्या इतिहासात झालं नाही.”

Comments are closed.