युद्ध परिस्थितीला पाकिस्तानच जबाबदार

भारताच्या सीमेवर पाकिस्तानने केलेल्या आगळीकीमुळे युद्धजन्य परिस्थिती ओढवली आहे. भारतातील दहशतवादी कारवायांशी आमचा काही संबंध नाही, हे किती जरी पाकिस्तान सरकारने सांगितले तरी दहशतवाद्यांच्या अंत्यविधीला पाकिस्तान सरकारच्या प्रतिनिधींची उपस्थिती यातून सर्व काही स्पष्ट होते, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले.

युद्ध ही आपली निवड नाही, हे अनेक वेळा देशाच्या पंतप्रधानांसह अनेकांनी स्पष्टपणे सांगितले आहे, पण जर आपल्यावर हल्ला झाला तर आपल्या रक्षणासाठी आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे असते आणि आज तीच खबरदारी घेतली जात आहे. आज आपला देश एका वेगळय़ा स्थितीतून जात आहोत. त्या स्थितीला सामोरे जाण्यासाठी मतभेद बाजूला ठेवून एक सशक्त भारत उभा करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे, असे शरद पवार सातारा येथे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमात बोलताना म्हणाले.

भारताने कधीही दहशतवादी चळवळीला प्रोत्साहन दिलेले नाही. आपल्या देशातील लोक हे शांततेचा पुरस्कार करणारे आहेत. सीमेवर जे काही घडत आहे त्यामागे पाकिस्तानातील सत्ताधारीच आहेत.

सैन्याच्या कामगिरीचा अभिमान
सैन्यदलाची कामगिरी पाहून अभिमान वाटतो. आता सैन्यदल महिलांच्याही हाती आहे. संरक्षण मंत्री असताना संरक्षण खात्यामध्ये नऊ टक्के महिलांची भरती व्हावी असा निर्णय आम्ही घेतला होता. त्याचाच परिणाम म्हणून आज महिला ब्रिगेड लष्करात अत्यंत मानाने उभी आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या मुख्य कर्नल सोफिया पुरेशी यांच्या धाडसाचा पवार यांनी उल्लेख केला.

Comments are closed.