मेघालयाच्या सीमावर्ती भागात रात्रीचे कर्फ्यू
बांगलादेश सीमेवर विशेष सतर्कता : रात्री 8 नंतर बाहेर पडण्यास बंदी
वृत्तसंस्था/ शिलाँग
पाकिस्तान आणि भारतादरम्यान तणाव आणि बांगलादेशातील सद्यस्थिती पाहता सीमावर्ती भागांना अलर्ट देण्यात आला आहे. मेघालयाच्या पूर्व खासी हिल्स जिल्ह्यात रात्र संचारबंदी लागू करण्यात आली आहे. ही संचारबंदी भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 163 अंतर्गत लागू करण्यात आली आहे. ही संचारबंदी आंतरराष्ट्रीय सीमेपासून 1 किलोमीटरच्या कक्षेsत असेल. हा निर्णय सध्या दोन महिन्यांपर्यंत लागू करण्यात आला आहे.
पूर्व खासी हिल्सचे जिल्हा न्यायदंडाधिकारी आर.एम. कुरबाह यांच्याकडून जारी आदेशानुसार रात्र संचारबंदी रात्री 8 वाजल्यापासून सकाळी 8 वाजेपर्यंत लागू असणार आहे. ही संचारबंदी 8 मेपासून दोन महिन्यांपर्यंत लागू राहिल.
मेघालयाच्या आदेशात नेमकं काय?
संचारबंदीचा उद्देश बांगलादेशातून भारतात अवैध घुसखोरी रोखणे आहे. कुठलीही अनधिकृत मिरवणूक किंवा 5 हून अधिक जण एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच काठी, दगड यासारख्या सामग्रीचा शस्त्रांच्या स्वरुपात वापर करण्यास बंदी घालण्यात आली आहे. याचबरोबर या आदेशाचा उद्देश सीमेनजीक निषिद्ध सामग्री, सुपारी, सुके मासे, बिडी, सिगारेट, चायपत्तीच्या तस्करीसोबत अवैध कारवायांवर अंकुश लावणे आहे. स्थितीचे गांभीर्य पाहता हा आदेश तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आला आहे.
बांगलादेशची भूमिका
ऑपरेशन सिंदूरनंतर बांगलादेशने स्वत:ची प्रतिक्रिया दिली होती. भारत आणि पाकिस्तानने संयम बाळगावा आणि तणाव कमी करण्यासाठी राजनयिक प्रयत्न करावेत असे आवाहन बांगलादेशने केले होते. भारत आणि पाकिस्तान यांच्यादरम्यान निर्माण होत असलेल्या स्थितीवर नजर ठेवून आहोत. बांगलादेश या स्थितीबद्दल तीव्र चिंता व्यक्त करतो आणि दोन्ही देशांना शांत राहण्याचे आणि संयम राखण्याचे आवाहन करत आहोत असे वक्तव्य बांगलादेशच्या विदेश मंत्रालयाने केले होते.
Comments are closed.