पाकिस्तानची पाठीमागे परत
कराची बंदर उद्ध्वस्त, अनेक शहरांमध्ये आगीचे लोळ, पाकिस्तानची विमाने धाराशायी, ड्रोन पाडले
वृत्तसंस्था / नवी दिल्ली शुक्रवारच्या दिवसाचा प्रारंभ होतानाच रात्री 12 वाजल्यानंतर पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचा पुन्हा एकदा विफल प्रयत्न केला आहे. मात्र, यानंतर भारताने केलेल्या विनाशकारी क्षेपणास्त्र हल्ल्यात पाकिस्तानातील अनेक शहरे भाजून निघाली आहेत. भारतीय नौदलानेही पाकिस्तानच्या सर्वात महत्वाच्या कराची बंदरावर 15 हून अधिक घातक क्षेपणास्त्रे डागल्याने त्याची जबरदस्त हानी झाली आहे. एक एफ 16 विमान, दोन जेएफ 17 विमानांसह पाकिस्तानची किमान 5 युद्धविमाने भारताने पाडविली आहेत. निम्म्याहून अधिक पाकिस्तानात आता अंधाराचे साम्राज्य पसरले असून, जागतिक राजकारणातही पाकिस्तान एकटा पडत चालल्याचे पहावयास मिळत आहे. अमेरिकेने पाकिस्तानला कोणतेही साहाय्य करण्यास नकार दिला असून कर्ज मिळणेही अत्यंत अवघड झाले आहे. शुक्रवारचा दिवस प्रारंभापासूनच पाकिस्तानसाठी अंध:कारमय ठरला. भारतावर त्याने ड्रोन हल्ला करण्याचा वारंवार प्रयत्न केला. पंजाब राज्याच्या सीमावर्ती शहरांवर त्याचा विशेषत्वाने रोख होता. तथापि, भारताच्या स्वदेशनिर्मित आकाश क्षेपणास्त्र प्रणालीने हे सर्व प्रयत्न अक्षरश: ‘मातीमोल’ केले. कारण पाकिस्तानचे सर्व ड्रोन्स आणि क्षेपणास्त्र लक्ष्यावर आदळण्यापूर्वीच मातीत मिसळली गेली. अनेक पाकिस्तानी ड्रोन्सचे आणि क्षेपणास्त्रांचे तुकडे आढळून आले आहेत. भारताची कोणतीही हानी या हल्ल्यांमध्ये झाली नसून पाकिस्तान मात्र भाजून निघत आहे.
सीमेवर 7 दहशतवाद्यांचा खात्मा
युद्धसदृश परिस्थितीच्या धामधुमीत पाकिस्तानने काश्मीरमध्ये दहशतवादी घुसविण्याचा केलेला प्रयत्न सीमा सुरक्षा दलाने हाणून पाडला आहे. भारतात घुसखोरी करु पाहणाऱ्या जैश ए मोहम्मदच्या सात दहशतवाद्यांनी कंठस्नान घालण्यात आले आहे. शुक्रवारी पहाटे सीमा सुरक्षा दलाने हा पराक्रम केला. सीमेवरच्या 9 भागांमध्ये पाकिस्तानी उखळी तोफा आणि मशिनगन्सचा मारा करुन भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न पाकिस्तानी रेंजर्सनी केला. मात्र, भारताने दिलेल्या कंबरतोड प्रत्युत्तरात पाकिस्तानच्या आघाडीवरच्या अनेक सैनिकी चौक्या उध्वस्त झाल्या असून अनेक पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याची शक्यता आहे. हजारो पाकिस्तानी सैनिकांनी चौक्या सोडून बंकर्समध्ये आश्रय घेतला आहे.
पाकिस्तानातील शहरांवर अचूक मारा
पाकिस्तानने भारतावर पुन्हा हल्ला करण्याचा प्रयत्न करण्याचे दु:साहस केल्याने भारताने त्याचा येथेच्छ प्रतिशोध घेतल्याचे दिसून येत आहे. रात्री दोन पर्यंत पाकिस्तानचे प्रयत्न होत होते. त्यानंतर मात्र, भारताने युद्धस्थितीचा ताबा घेत, पाकिस्तानवर गेल्या तीन दिवसांमधील सर्वात मोठा हल्ला केला आहे. पाकिस्तानातील कराची शहरामधील अनेक लष्करी आस्थापने उध्वस्त करण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे रावळपिंडी पाकिस्तानची उपराजधानी, बहावलपूर हे हाफिझ सईदचे आश्रययस्थान, तर पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद यांच्यावर भारताने जोरदार आणि अचूक हल्ले चढविले आहेत. या शहरांमध्ये आगीचे लोळ उठताना दिसून येत असून पाकिस्तानात प्रचंड घबराट पसरल्याचे दिसत आहे. कराची शहराची सर्वाधिक हानी
भारताच्या प्रतिहल्ल्यात कराची शहराची सर्वाधिक हानी झाल्याचे वृत्त आहे. या शहरात भारताच्या क्षेपणास्त्र माऱ्याने अनेक स्थानी आगी लागल्या असून रात्रभर ब्लॅकआऊट लागू करण्यात आला होता. कराची बंदर परिसरातही वाहतूक बंद करण्यात आली होती. या बंदराची संरक्षण करणारी पाकिस्तानची एअरबोर्न वॉर्निंग व्यवस्था नष्ट करण्यात आल्याने पाकिस्तानची चिंता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. इस्लामाबाद
पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादही भारताच्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन्सच्या माऱ्यातून सुटले नसल्याचे दिसून येत आहे. पाकिस्तानचे नेते शहाबाझ शरीफ यांच्या निवासस्थानापासून 9 किलोमीटर अंतरावर भारताचे एक क्षेपणास्त्र आदळले आहे. त्यामुळे त्यांच्यावर बंकरमध्ये आश्रय घेण्याची वेळ आली असल्याचे वृत्त आहे. कराची बंदरावर हल्ला झाल्याच्या वृत्ताचा पाकिस्तानकडून इन्कार करण्यात आला असला, तरी प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार भारताने अचूक मारा केला आहे. पंतप्रधान मोदी यांच्यामुळे एस 400
पाकिस्तानविरुद्धच्या या संघर्षात भारताने रशियाकडून घेतलेल्या एस 400 या क्षेपणास्त्र, ड्रोन आणि विमानविरोधी यंत्रणेने अतुलनीय कामगिरी केली आहे. ही यंत्रणा भारताने विकत घेऊ नये, असा दबाव भारतावर टाकण्याचा प्रयत्न काही मोठ्या देशांनी केला होता. तथापि, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या दबावासमोर झुकले नाहीत. त्यांनी याच यंत्रणेची निवड केली. हीच यंत्रणा आज भारताच्या संरक्षणामध्ये अग्रेसर राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या निर्धाराचे आज अनेक सैनिकी आणि आंतरराष्ट्रीय तज्ञांकडून कौतुक केले जात आहे. राफेल विमानांसंबंधीही अशाच विरोधाला त्यांना सामोरे जावे लागले होते. तथापि, त्यांच्या पुढाकाराने आज भारताकडे राफेलसारखे बिनतोड विमान आहे, जे या संघर्षात भारताला वर्चस्व मिळवून देताना दिसत आहे, असे तज्ञांचे मत आहे. पाकिस्तानची पाच विमाने मातीत
पाकिस्तानने अमेरिकेशी केलेल्या कराराचा भंग करत एफ 16 विमानाचा उपयोग करण्याचा प्रयत्न केला. मात्र पंजाबमध्ये भारताच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात हे विमान धाराशायी झाले. त्याचप्रमाणे चीनकडून पाकिस्तानला मिळालेली जेएफ-17 प्रकारची दोन विमानेही भारताने पाडविली आहेत. यासंबंधात चीनलाही आश्चर्य वाटत आहे. जेएफ-17 ही विमाने राफेलच्या तोडीस तोड मानली गेली होती. तथापि, प्रत्यक्ष या दोन विमानांच्या कामगिरीचा प्रश्न आला तेव्हा राफेल हे अनेक पटींनी श्रेष्ठ असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता जेएफ-17 विमानांचा उपयोग करायचा का, हा प्रश्न पाकिस्तानसमोर उभा ठाकला असल्याचे बोलले जात आहे. पाकिस्तानची आणखी दोन विमाने धाराशायी झालेल्या अनधिकृत वृत्त आहे. मात्र, दोन जेएफ-17 विमाने धुळीला मिळल्याची बाब पाकिस्तानेही मान्य केली आहे.
आंध्र सैनिक हुतात्मा
भारताच्या क्षेपणास्त्र हल्ल्याने प्रत्युत्तर न देता आल्याने चवताळलेल्या पाकिस्तानने जम्मू क्षेत्रात सातत्याने गोळीबार चालविला आहे. या गोळीबारात भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातला एक सैनिक धारातीर्थी पडून त्याला हौतात्म्य प्राप्त झाले आहे. मुरली नाईक असे त्याचे नाव असून तो 27 वर्षांचा होता. तो आंध्र प्रदेशातील सत्य साई जिल्ह्यातील पुट्टागुंडलापल्ली या खेड्यातील होता. त्याच्या हौतात्म्याचे वृत्त त्याच्या कुटुंबियांना कळविण्यात आले असल्याची महिती देण्यात आली आहे. अमेरिका आणि इस्रायलकडून भारताचे आभार
अमेरिकेच्या वॉलस्ट्रीट जर्नल या वृत्तपत्राचा एक साहसी पत्रकार डॅनियल पर्ल याने पाकिस्तानी दहशतवादी संघटनांच्या क्रौर्याचा पर्दाफाश करणारा एक अहवाल प्रसिद्ध केला होता. इस्लामी दहशतवाद्यांनी अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर दहशतवादी हल्ला करुन जगभरात खळबळ उडवून दिली होती. या हल्ल्याचा सूत्रधार रौफ अझहर ऊर्फ अब्दुल रौफ याने डॅनियल पर्ल यांची अत्यंत निर्घृणपणे शीर कापून हत्या केली होती. हा रौफ भारताच्या ‘सिंदूर अभियाना’त ठार झाला होता. त्याला मारल्यामुळे अमेरिकेने आणि इस्रायलने भारताचे आभार मानले आहेत. डॅनियल पर्ल हे ज्यू होते. त्यामुळे इस्रायलला त्यांच्याविषयी विशेष आस्था होती. अमेरिकेतील ज्यू समुदायानेही यासाठी भारताला धन्यवाद दिले आहेत. अमेरिकेच्या एक वरीष्ठ मुत्सद्दी एली कोहेनिम यांनीही भारताची प्रशंसा केली आहे. मी भारताची व्यक्तीश: आभारी आहे, असे त्यांनी त्यांच्या संदेशात स्पष्ट केले आहे. रौफ याचा खात्मा झाल्याने न्याय मिळाल्याची भावना आहे.
सीमावर्ती भागात घरांवर हल्ला
ड हताश आणि चवताळलेल्या पाकिस्तानने नागरी वस्त्यांना केले लक्ष्य. जम्मू-अखनूर क्षेत्रात काही घरांवर बाँबफेक, लोकांना हलविले सुरक्षित स्थानी
पाकिस्ताननेही अशी मागणी केली
भारताच्या विनाशकारी हल्ल्यासमोर हताश झालेल्या पाकिस्ताने जगासमोर पसरला भीकेसाठी पदर, अनेक मित्रदेशांसमोर केली कर्जासाठी याचना अमेरिकेचा पाकिस्तानला ठेंगा भारत-पाकिस्तान संघर्ष ऐन भरात असताना पाकिस्तानला जी अपेक्षा होती ती अमेरिकेने ठरविली फोल. तुमचे तुम्ही बघून घ्या, असा दिला स्पष्ट संदेश 300 ते 400 ड्रोन्सचा उपयोग
पाकिस्तानने भारतावर रात्री 300 ते 400 ड्रोन्सच्या साहाय्याने मारा करण्याचा प्रयत्न केला. सीमावर्ती भागांमधील भारतीय सेनाकेंद्रांना लक्ष्य करण्याची त्याची योजना होती. तथापि, ती फोल ठरली आहे. बहुतेक ड्रोन्स हवेतच नष्ट करण्यात आले आहेत. तर काही ड्रोन्स पडले तरी ते नेम चुकून निर्मनुष्य जागी पडले.
पंतप्रधान मोदी यांच्या बैठका
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी संध्याकाळी भारतीय नौदलाचे प्रमुख अॅडमिरल दीनेश त्रिपाठी यांच्याशी सविस्तर चर्चा केली आहे. शुक्रवारी नौदलाने केलेल्या कामगिरीची माहिती यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आली. या बैठकीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल हेही उपस्थित होते. बैठक गुप्त असल्याने नेमके काय ठरले, यासंबंधीची माहिती उघड करण्यात आली नाही. दाऊद इब्राहिम पाकिस्तानातून पसार?
भारत आणि पाकिस्तान तणाव पाहता मोस्ट वाँटेड गुन्हेगार दाऊद इब्राहिम पाकिस्तानातून पळाल्याची चर्चा आहे. दाऊद हा अनेक वर्षांपासून पाकिस्तानच्या कराची शहरात वास्तव्यास होता. परंतु भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे भयभीत पाकिस्तानने दाऊद इब्राहिम, त्याचा हस्तक छोटा शकील आणि मुन्ना झिंगडाला एका गुप्त ठिकाणी लपवून ठेवले होते. तर तिन्ही गुन्हेगार आता पाकिस्तानातून दुसऱ्या देशात पसार झाल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. भारताच्या एअरस्ट्राइकमुळे भयभीत दाऊद आता स्वत:चा जीव वाचविण्यासाठी सुरक्षित आश्रय शोधत असल्याचे समजते. तर दाऊद आणि त्याचे हस्तक पाकिस्तानातच अन्यत्र लपले असण्याचीही शक्यता आहे. अशाप्रकारचे इनपूट भारतीय गुप्तचर यंत्रणांची दिशाभूल करण्यासाठी फैलावले गेल्याचीही शक्यता आहे. तर भारतीय गुप्तचर यंत्रणा सर्वप्रकारच्या इनपूट्सना स्वत:कडे उपलब्ध अनेक प्रकारच्या स्रोतांद्वारे पडताळून पाहत आहे.
Comments are closed.