आतापर्यंत पाकिस्तानचा प्रतिसाद रोखला गेला आहे

संरक्षण विभागाचे प्रतिपादन : मात्र, यापुढे आगळीक केल्यास मोठा तडाखा निश्चितपणे देणार

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

पाकिस्तानच्या कुरापतींना आतापर्यंत भारताच्या सैन्यदलांनी अतिशय संयमितपणे आणि नियमांच्या चौकटीत राहून प्रत्युत्तर दिले आहे. मात्र, पाकिस्तानची खुमखुमी अशीच राहिल्यास यापुढे त्याला सैल सोडले जाणार नाही, असा अर्थाचे वक्तव्य भारताचा संरक्षण विभाग आणि परराष्ट्र व्यवहार विभाग यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत करण्यात आले आहे. ही पत्रकार परिषद शुक्रवारी संध्याकाळी साडेपाच वाजता घेण्यात आली. शुक्रवारी सैन्यदलांनी पेलेल्या कामगिरीची माहिती संरक्षण विभागाच्या प्रवक्त्या लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी दिली. तर परराष्ट्र व्यवहार विभागाच्या हालचालींची माहिती या विभागाचे मुख्य सचिव विक्रम मिसरी यांनी दिली आहे.

पाकिस्तानात चार स्थानी मोठे हल्ले करण्यात आले अशी माहिती कुरेशी यांनी दिली. पाकिस्तानची रडार यंत्रणा हे या हल्ल्यांचे लक्ष्य होते. पाकिस्तानची एक आरडी रडार यंत्रणा नष्ट करण्यात आम्हाला यश आले आहे. अन्यत्रही मोठ्या प्रमाणात आमच्या हल्ल्यांमुळे विनाश झाला आहे. पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय नियमांचा भंग करुन भारतातील नागरी स्थानांना लक्ष्य बनविण्याचा प्रयत्न केला. पण तो भारताच्या सजग आणि अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणेने फोल ठरविला. पाकिस्तानने 300 ते 400 ड्रोन फेकण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यातील बहुतेक सर्व ड्रोन भूमीवर पडण्याआधी आकाशातच नष्ट करण्यात आले. त्यामुळे भारताची फारशी हानी झाली नाही, अशी माहिती कुरेशी यांनी पत्रकारांना दिली.

पाकिस्तानकडून घरांवर हल्ले

सीमवर्ती भागांमध्ये पाकिस्तानी सेना आणि रेंजर्स यांच्याकडून सर्वसामान्य नागरीकांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करण्यात आला. काही नागरीक जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. एका महिलेचा मृत्यू झाला आहे. मात्र, पाकिस्तानचे बव्हंशी हल्ले निकामी करण्यात आले. पंजाबमध्ये अमृतसर आणि राजस्थानात जैसरमेर येथे ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न झाला. पण तो फोल ठरला. जैसलमेरमध्ये सुरक्षा आणि खबरदारीचा उपाय म्हणून ब्लॅकआऊट करण्यात आला होता. तसेच जम्मूमध्ये एक तासभर सायरन वाजविण्यात आला होता. पाकिस्तानची क्षेपणास्त्रे आणि ड्रोन यांचे अवशेष सापडले आहेत. त्यांची तपासणी होत आहे, अशी माहिती कुरेशी यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे.

वायुदलाची अजोड कामगिरी

संघर्षाच्या तिसऱ्या दिवशीही वायुदलाने अजोड आणि अभिमानास्पद कामगिरी केली आहे. वायुदलाने आकाश या क्षेपणास्त्राचा अचूक आणि सटीक मारा करुन पाकिस्तानची क्षेपणास्त्रे पाडविण्यात आली. भारताने ‘समर’ या क्षेपणास्त्राचा उपयोग केला. या दोन्ही यंत्रणा स्वदेशी आहेत. पाकिस्तानने हल्ला करताना आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन केले आहे. भारताने मात्र, अत्यंत संयमित कारवाई केली. भारतीय वायुदलाने आपली क्षमता सिद्ध करताना पाकिस्तानच्या प्रत्येक योजनेचा बोजवारा उडविला आहे, असे प्रतिपादन विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी केले.

विक्रम मिस्त्री यांचा इशारा

पाकिस्तानने भारताच्या संयमाची परीक्षा पाहू नये. एव्हान, आपल्या दुर्बलतेची जाणीव त्याला झाली आहे. पाकिस्तानने हल्ले थांबविले नाहीत, तर भारत याहीपेक्षा मोठा हल्ला करु शकतो, असा स्पष्ट इशारा परराष्ट्र व्यवहार विभागाचे मुख्य सचिव विक्रम मिस्त्री यांनी दिला आहे. त्यांनी पत्रकारांच्या काही प्रश्नांना उत्तरेही दिली. भारताने पाकिस्तानच्या प्रत्येक कृतीला चोख प्रत्युत्तर दिले आहे. पाकिस्तानची मोठी हानी झाली आहे. पाकिस्तान थांबला नाही, तर त्याची अवस्था अधिक कठीण होईल, अशा अर्थाचे वक्तव्य विक्रम मिस्त्री यांनी केले.

Comments are closed.