देशात अन्नाच्या धान्यांची कमतरता नाही!
पाकिस्तानसोबत वाढत्या तणावादरम्यान सरकारचे आश्वासन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पहलगाम हल्ल्यानंतर पंधरा दिवसांनी भारताने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांवर हवाई हल्ला करत बदला घेतला. वाढत्या तणावामुळे काही लोक अन्नपदार्थांचा साठा करत असतानाच केंद्रीय अन्न मंत्री प्रल्हाद जोशी यांनी लोकांना अन्नधान्य साठवून ठेवू नये असे आवाहन केले आहे. देशात सर्व आवश्यक वस्तूंचा पूर्ण साठा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यापूर्वी तेल कंपन्यांकडून देशात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी सिलिंडरचा तुटवडा नसल्याची घोषणा करण्यात आली होती.
केंद्रीय अन्न मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सोशल मीडिया ‘एक्स’वर एका पोस्टमध्ये अन्नधान्याच्या मुबलक पुरवठ्याविषयीची माहिती दिली. देशाच्या काही भागात अफवा पसरत असल्यामुळे लोक आवश्यक अन्नपदार्थ आणि दैनंदिन गरजेच्या अनेक वस्तू गोळा करण्यात गुंतले आहेत. अन्नमंत्र्यांनी साठेबाजीची गरज स्पष्टपणे नाकारली. ‘देशभरात आमच्याकडे प्रत्येक जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा आहे. आमच्याकडे गरजेपेक्षा कितीतरी पटीने जास्त साठा आहे आणि देशाच्या कोणत्याही भागात लोकांना बाजारात गर्दी करण्याची गरज नाही,’ असे केंद्रीय मंत्र्यांनी म्हटले आहे.
अफवांवर विश्वास नको!
देशात जीवनावश्यक वस्तूंची कमतरता नाही आणि कोणीही अशा अफवांवर लक्ष देऊ नये, असेही सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, अनेक राज्यांनी शाळा बंद करण्याची, सीमावर्ती जिह्यांमध्ये वीजपुरवठा खंडित करण्याची आणि पोलीस आणि प्रशासन अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्याची घोषणा केली आहे.
Comments are closed.