लाडक्या बहिणींना जूनमध्ये 2100 रुपये मिळणार, डोनाल्ड ट्रम्प यांची अजितदादांशी चर्चा; मीम्सवर नेटकऱ्यांना हसू आवरेना

लाडकी बहीण योजनेवरून महायुती सरकारवर विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे. 2100 रुपये कधी मिळणार, असा सवाल केला जात आहे. यामध्ये आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी केली आहे. ट्रम्प यांनी थेट अर्थमंत्री अजित पवार यांना पह्न केला. त्यानंतर अजितदादांनी तातडीचा निर्णय घेत जूनमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यात 2100 रुपये जमा करण्याचे आदेश दिले आहेत. कदाचित हे वाचून लाडक्या बहिणी खूश होतील, पण हा सोशल मीडियावर व्हायरल झालेला मीम्स आहे. हा मीम्स पाहून नेटकऱ्यांना हसू आवरेनासे झाले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी तोच मीम्स आपल्या अकाऊंटवर शेअर करत सरकारवर विशेषकरून अजितदादांवर निशाणा साधला आहे. ‘अजित पवार यांच्यासोबत रात्री झालेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की येत्या जूनपासून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी दरमहा 2100 रुपये देण्याचे त्यांनी मान्य केले आहे. सर्व लाडक्या बहिणींचे अभिनंदन, जय महाराष्ट्र!’ अशा आशयाचा डोनाल्ड ट्रम्प यांचा हा मीम्स आहे.

हिंदुस्थान-पाकिस्तान तणावामध्ये ट्रम्प यांनी शस्त्रसंधी झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर पोस्ट करण्याची आगळीक केली. त्यावरून ट्रम्प यांच्यासह पेंद्र सरकारवरही विरोधक तुटून पडले आहेत. तीच वस्तुस्थिती या मीम्सद्वारे जगासमोर मांडली गेली आहे. रोहिणी खडसे यांनी ते मीम्स शेअर करताना हे व्हॉट्सअॅपवर फिरतेय, असेही नमूद केले आहे.

Comments are closed.