गैरहजर राहणाऱ्या मुख्याध्यापिका, ट्रस्टींना दणका; हायकोर्टाने जारी केले जामीनपात्र वॉरंट

हजर राहण्याचे आदेश देऊनही न्यायालयात न येणाऱ्या वडाळ्यातील एका शाळा मुख्याध्यापिका, ट्रस्टींविरोधात उच्च न्यायालयाने जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे.
मुख्याध्यापिका शारदा पाटील, ट्रस्टी रवींद्र माने, रमाकांत गावडे व शहाबाज पठाण यांच्या विरोधात न्या. अजय गडकरी व न्या. कमल खाथा यांच्या खंडपीठाने दहा हजार रुपयांचे जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. स्थानिक पोलिसांनी या वारंटची अंमलबजावणी करावी, असे आदेश देत न्यायालयाने ही सुनावणी 20 जून 2025 पर्यंत तहकूब केली. हे सर्व वडाळ्यातील निर्मल विद्यालयात कार्यरत आहेत. शाळा ट्रस्टींनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन न करणे दुर्दैवी आहे, असे निरीक्षण खंडपीठाने नोंदवले.
धर्मादाय आयुक्तांना चौकशीचे आदेश
शाळा ट्रस्टच्या कारभाराची धर्मादाय आयुक्तांनी चौकशी करून त्याचा अहवाल न्यायालयात सादर करावा. शाळा इमारतीच्या बांधकामासाठी सर्व परवानग्या घेण्यात आल्या आहेत की नाही याचीही आयुक्तांनी शहानिशा करावी, असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.
काय आहे प्रकरण
लकडावाला हाऊसिंग प्रा. लि. व अन्य यांनी एसआरए विरोधात याचिका केली आहे. एसआरएच्या ट्रान्झिट पॅम्पचा मुद्दा याचिकेत उपस्थित करण्यात आला आहे. याप्रकरणी न्यायालयाने या ट्रस्टींना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. या आदेशाचे पालन न झाल्याने खंडपीठाने संताप व्यक्त केला.
Comments are closed.