रेल्वे खात्यात नोकरीचे आमिष; 13 तरुणांना 1 कोटींचा गंडा, आयकार्ड, रजिस्ट्रेशन बॅच, नियुक्तीपत्रेही बनावट

रेल्वेत नोकरीचे आमिष दाखवून 13 बेरोजगार तरुणांना 1 कोटी 2 लाख रुपयांचा गंडा घातल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. या तरुणांना आयकार्ड, रजिस्ट्रेशन बॅच एवढेच नव्हे तर नियुक्तीपत्रेदेखील बनावट दिली असून या फसवणूकप्रकरणी सात भामट्यांविरोधात नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, बेरोजगार तरुणांना फसवणाऱ्यांचे मोठे रॅकेट असण्याची शक्यता असून त्यादृष्टीने पोलीस तपास करीत आहेत.

भाईंदर व परिसरातील शिकलेले बेरोजगार तरुण हेरून त्यांना रेल्वेमध्ये नोकरी देण्याचे आश्वासन दिले जायचे. या मुलांच्या पालकांचेदेखील ब्रेन वॉशिंग करून पैसे उकळण्याचा गोरखधंदा या रॅकेटने सुरू केला होता. नोकरीच्या शोधात असलेले काही तरुण त्यांना बळी पडले आणि या सर्वांची घोर फसवणूक करण्यात आली. रेल्वेमध्ये विविध पदांवर आपली नेमणूक होणार असून आयकार्ड, नियुक्तीपत्र व आवश्यक ती कागदपत्रे विश्वास बसावा म्हणून देण्यात आली, पण ही सर्व कागदपत्रे बनावट असल्याचे लक्षात येताच बेरोजगार तरुणांनी पोलीस ठाणे गाठले आणि फसवणूक करणाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली.

सात भामट्यांवर गुन्हा दाखल
पोलिसांनी या प्रकरणाचा मोठ्या शिताफीने छडा लावत सात जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. त्यात मुरली गंजी, मुल्लागिरी मल्लिका, पीट्टा राजेंद्रकुमार, राघवराजू नेल्यापुडी, मधुकुवार नेल्यापुडी, अशोककुमार बंका, सुरेश कुमार यांचा समावेश असून त्यांच्या आणखी काही साथीदारांचीदेखील चौकशी करण्यात येत आहे.

शिवीगाळ, धमकी

आपली फसवणूक झाल्याचे समजताच बळी पडलेल्या काही तरुणांनी पैसे परत मागितले, तर भाईंदरच्या आनंद कॉम्प्लेक्समध्ये राहणाऱ्या मोहनराव पल्येटी यांच्या तक्रारीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. ज्यांनी पैसे परत मागितले अशांना या भामट्यांनी शिवीगाळ करत मारहाण करण्याची धमकी दिली असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक धीरज कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अप्पाराव आहेर हे अधिक तपास करीत आहेत.

Comments are closed.