Maharashtra Board 10th Result 2025 state result 94.10 percent; This year too, girls prevail, Konkan also tops
मुंबई : 12 वीच्या निकालानंतर सर्वांना उत्सुकता होती ती 10 वीच्या निकालाची. आज मंगळवारी (ता. 13 मे) दुपारी 1 वाजता विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने हा निकाल पाहता येणार आहे. पण त्याआधी महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाकडून या निकालासंदर्भतील पत्रकार परिषद घेण्यात आली आहे. राज्याचा यंदाचा निकाल हा 94.10 टक्के लागल्याची घोषणा करण्यात आली आहे. तर नेहमीप्रमाणे यंदाही मुलींनीच बाजी मारली असून त्यांचा निकाल 96.14 टक्के लागला आहे. तर परंपरेप्रमाणे कोकण विभागीय मंडळाने आपला प्रथम क्रमांक सोडला नसून कोकणचा निकाल 98.82 टक्के लागल्याची घोषणा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेतून केली आहे. (Maharashtra Board 10th Result 2025 state result 94.10 percent; This year too, girls prevail, Konkan also tops)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल सकाळी 11 वाजता पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जाहीर करण्यात आला आहे. शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषद घेत या निकालासंदर्भातील सर्व माहिती प्रसार माध्यमांना दिली आहे. यंदा राज्याचा दहावीचा निकाल 94.10 टक्के इतका लागला आहे. बारावीप्रमाणे दहावीच्या निकालातही मुलींनीच बाजी मारली आहे. तसेच दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकणाचा निकाल सर्वाधिक लागला आहे. शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दहावीच्या निकालाची वैशिष्ट्ये सांगत म्हटले की, यंदा दहावीसाठी 15 लाख 46 हजार 569 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 14 लाख 55 हजार 477 विद्यार्थी पास झाले. यंदाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 94.10 टक्के इतकी आहे.
तर 28 हजार 12 खासगी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 22 हजार 518 विद्यार्थी पास झाले. तसेच 9 हजार 673 दिव्यांग विद्यार्थी नोंदणी केली होती. त्यापैकी 9 हजार 585 विद्यार्थी बसले. यातील 8 हजार 848 पास झाले. दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल 92.27 टक्के इतका लागला आहे. तसेच, या परीक्षेत नऊ विभागीय मंडळातील एकूण 16 लाख 10 हजार 908 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी 15 लाख 98 हजार 553 विद्यार्थी बसले. 14 लाख 87 हजार 399 विद्यार्थी पास झाले आहे. त्यांची टक्केवारी 93.04 टक्के आहे. फ्रेश विद्यार्थ्यांचा निकाल 94.10 टक्के आहे. तर सर्व विद्यार्थ्यांचा (खासगी, दिव्यांग, फ्रेश, पुनरपरीक्षार्थी) निकाल 93.04 टक्के आहे, असेही शरद गोसावींनी सांगितले.
निकालाची विभागनिहाय टक्केवारी
- पुणे : 94.81 टक्के
- नागपूर : 90.78 टक्के
- संभाजीनगर : 92.82 टक्के
- मुंबई : 95.84 टक्के
- कोल्हापूर : 96.78 टक्के
- अमरावती : 92.95 टक्के
- नाशिक : 93.04 टक्के
- लातूर : 92.77 टक्के
- कोकण : 99.82 टक्के
असा पाहा निकाल…
सर्वप्रथम महाराष्ट्र बोर्डाच्या mahahsscboard.in या अधिकृत वेबसाइटवर जा.
त्यानंतर होमपेजवर उपलब्ध असलेल्या महाराष्ट्र एसएससी निकाल 2025 लिंकवर क्लिक करा.
त्यानंतर एक नवीन पेज उघडेल जिथे उमेदवारांना लॉगिन तपशील प्रविष्ट करावे लागतील.
आता सबमिट वर क्लिक करा आणि तुमचा निकाल दिसेल.
तुमचा निकाल तपासा आणि पेज डाउनलोड करा.
भविष्यातील वापरासाठी याची एक हार्ड कॉपी तुमच्याकडे ठेवा.
या वेबसाइटवर पाहा निकाल…
https://results.digilocker.gov.in
https://sscresult.mahahsscboard.in
http://sscresult.mkcl.org
https://results.targetpublications.org
Comments are closed.