तिची गोष्ट’ सांगण्यासाठी आले एकत्र… कलाप्रेमींना उत्तम ते देण्याचा आमचा मानस – गौरी कालेलकर-चौधरी – Tezzbuzz
कलेचे माध्यम कोणतेही असो नवीन, सर्जनशील विचारांची निर्मिती आणि त्याची देवाणघेवाण होणे गरजेचे असते. नवनवीन कलाकार, दिग्दर्शक, तंत्रज्ञ घडत जातात तेव्हाच सर्जनशीलतेला वाव मिळत असतो. मनोरंजनविश्वात आपला ठसा उमटवत काहीतरी वेगळं करू पाहणारी अशीच काही मंडळी एकत्र आली आहेत.
कै.मधुसूदन कालेलकर हे नाव कलाप्रेमींसाठी नवं नाही. ख्यातनाम नाटककार, गीतकार, लेखक, पटकथाकार, नाट्य / चित्रपट निर्माता अशा बहुविध भूमिकेतून रसिकांना अखंड रिझवणारे ज्येष्ठ लेखक कै.मधुसूदन कालेलकर यांचा वारसा समर्थपणे पुढे नेत त्यांच्या नातीने गौरी कालेलकर-चौधरी आणि तिचे पती सिद्धेश चौधरी यांनी ‘मधुसूदन कालेलकर प्रोडक्शन्स’ या निर्मिती संस्थेची स्थापना केली आहे. कलासंस्कृतीचे व्रत जोपासणाऱ्या या निर्मिती संस्थेने, संस्थेचे सदस्य परी तेलंग आणि शंतनू तेंडुलकर ह्यांच्या सहकार्याने व ‘थिएटरऑन एंटरटेनमेंट’ आणि ‘पी एस डी जी स्टुडिओज प्रोडक्शन’ यांच्या साथीने “एक तिची गोष्ट” रंगमंचावर आणली आहे.
११ मे ला ‘नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर’ मध्ये झालेल्या शुभारंभाच्या प्रयोगाला नाट्यरसिकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. नृत्य,संवाद आणि अभिनय यांचा उत्तम मिलाफ असलेली “एक तिची गोष्ट” चे पुढील प्रयोग शनिवार १७ मे पुण्याच्या भारत नाट्य मंदिर येथे रात्रौ ९.३० वा. आणि शनिवार २४ मे रात्रौ ८.३० वा. श्री शिवाजी मंदिर दादर येथे होणार आहेत.
मनमोहक नृत्य, त्याला अर्थपूर्ण संगीताची आणि उत्तम अभिनय, निवेदनाची जोड मिळाल्यावर उभी राहणारी सुंदर कलाकृती आनंदाची अनुभूती देऊन जाते, हीच अनुभूती “एक तिची गोष्ट” च्या माध्यमातून नाट्यरसिकांना मिळणार आहे. या सृजनशील कलाकृतीचं खास आकर्षण म्हणजे फुलवा खामकर आणि त्यांची मुलगी आस्मा खामकर यांच्या नृत्याची अदाकारी रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. अभिनेता विराजस कुलकर्णी, सूरज पारसनीस यांनी याचे दिग्दर्शन केले आहे.आर्या आंबेकर, वैशाली सामंत, ऋषिकेश रानडे यांनी यातील गाणी स्वरबद्ध केली आहेत. संगीत निषाद गोलांब्रे यांचे आहे. चाळीशीतली अनया आणि तिच्या आयुष्यात आलेली एक किशोरवयीन मुलगी या दोघींच्या भावविश्वातून या नृत्यनाटिकेची कथा उलगडते.
येत्या काळात मराठी कला, साहित्य आणि संस्कृती सर्वदूर पोहोचवणं हे ‘मधुसूदन कालेलकर प्रॉडक्शन्स’चं उद्दिष्ट असल्याचं गौरी कालेलकर-चौधरी यांनी स्प्ष्ट केलं. भविष्यात वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या व विषयाच्या माध्यमातून सांस्कृतिक उपक्रम राबवणार असून ज्यात कला संस्कृतीपासून तरुणांच्या कल्पनाशक्तीला, सृजनशक्तीला वाव देण्याचा प्रयत्न असल्याचे गौरी कालेलकर-चौधरी यांनी सांगितले.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
Comments are closed.