नाच-गाणं बंद करा, गावसकरांचे बीसीसीआयला आवाहन

हिंदुस्थान-पाकिस्तान यांच्यातील सीमेवरील तणाव निवळल्यानंतर आयपीएलचा धमाका पुन्हा एकदा सुरु होतोय. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेल्या कुटुंबीयांच्या भावनांचा आदर करण्यासाठी बीसीसीआयने पुढील 17 सामन्यांमध्ये नाच-गाणं म्हणजेच डीजेचा गोंगाट आणि चीअरलीडर्सचं थिरकणं बंद करावे ,असे आवाहन महान फलंदाज आणि समालोचक सुनील गावसकर यांनी बीसीसीआयला केले आहे.
पहलगाम हल्ल्याचा बदला घेताना हिंदुस्थानी सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या अंतर्गत पाकिस्तानी दहशतवादी ठिकाणांवर हल्ले केल्यामुळे सीमेवर युद्धसदृश स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे आयपीएललाही स्थगित करण्यात आले होते. आता युद्धविरामाच्या निर्णयानंतर पुन्हा एकदा आयपीएलची आतषबाजी सुरू होणार आहे. आयपीएलला फक्त क्रिकेटपर्यंतच मर्यादित ठेवून पहलगाम हल्ल्यातील मृतात्म्यांच्या कुटुंबीयांचा सन्मान ठेवावा, असा सल्ला गावसकरांनी बीसीसीआयला दिला आहे. या सामन्यादरम्यान प्रेक्षकांना येण्याची परवानगी द्यावी परंतु मैदानात केवळ क्रिकेट व्हावे. नाच-गाणं बंद करावे. सीमेवरील तणावामुळे एक आठवडय़ासाठी आयपीएल स्थगित ठेवण्याचा बीसीसीआयचा निर्णय योग्य असल्याचेही गावसकर म्हणाले.
Comments are closed.