बीएसएफ जवान 21 दिवसांनंतर रिलीज झाला
कॉन्स्टेबल पूर्णम शॉ भारताच्या स्वाधीन : ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तान बॅकफूटवर
वृत्तसंस्था/ श्रीनगर, नवी दिल्ली
पंजाबमधील अटारी-वाघा सीमेवरून 23 एप्रिल रोजी पकडण्यात आलेला बीएसएफ जवान पूर्णम कुमार शॉ याला पाकिस्तानने बुधवारी भारताच्या स्वाधीन केले. बुधवार 14 मे रोजी सकाळी 10:30 वाजता पाकिस्तानी रेंजर्सनी कॉन्स्टेबल शॉ याला सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) स्वाधीन केले. ही कारवाई शांततेत आणि स्थापित प्रोटोकॉलनुसार पार पडल्याचे बीएसएफच्या प्रवक्त्याने सांगितले.
पंजाबमधील फिरोजपूर सेक्टरमध्ये चुकून आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडल्यानंतर सीमा सुरक्षा दलाच्या जवानाला पाकिस्तानी रेंजर्सनी पकडले होते. ही घटना 23 एप्रिल रोजी घडली होती. 182 व्या बीएसएफ बटालियनचे कॉन्स्टेबल पूर्णम कुमार शॉ असे या जवानाचे नाव आहे. तो भारत-पाकिस्तान सीमेजवळील एका शेतात ड्युटीवर होता. नियमित सेवा बजावताना तो चुकून भारतीय सीमेचे कुंपण ओलांडून पाकिस्तानी हद्दीत घुसल्यानंतर त्याला पाकिस्तानी रेंजर्सनी ताब्यात घेतले होते.
पत्नीकडून पंतप्रधानांचे आभार
पूर्णम शॉ हा मूळचा पश्चिम बंगालमधील रिशरा येथील रहिवासी आहे. काही दिवसांपूर्वी सैनिकाची पत्नी रजनी हिने पतीच्या सुटकेबाबत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली होती. चंदीगडला पोहोचल्यानंतर रजनी यांनी बीएसएफ अधिकाऱ्यांचीही भेट घेतली. त्यानंतर भारताकडून त्याच्या सुटकेसाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू होते. आता पूर्णमची पत्नी रजनी हिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.
प्रकरणाची पार्श्वभूमी
हिमाचलमधील कांगडा येथे बीएसएफच्या 34 व्या बटालियनमध्ये तैनात असलेला पूर्णम कुमार शॉ हा जवान 16 एप्रिल 2025 रोजी पंजाबमधील पठाणकोटजवळ फिरोजपूर येथे तैनात होता. 22 एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये 26 जणांची हत्या केली. याचदरम्यान, 23 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11:50 वाजता फिरोजपूर सेक्टरच्या परिसरात कर्तव्यावर असताना कॉन्स्टेबल पूर्णम कुमार शॉ अनवधानाने पाकिस्तानी हद्दीत घुसले आणि त्यांना पाकिस्तानी रेंजर्सनी ताब्यात घेतले होते.
जवानाच्या सुटकेसाठी अनेक वेळा ध्वज बैठक
चुकून पाकिस्तानी सीमेत घुसलेल्या बीएसएफ जवानाच्या सुटकेसाठी अनेक वेळा ध्वज बैठका (फ्लॅग मिटिंग) बोलावण्यात आल्या, परंतु पाकिस्तानी रेंजर्सकडून कोणताही ठोस प्रतिसाद मिळत नव्हता. पाकिस्तान जाणूनबुजून ध्वज बैठकीला महत्त्व देत नव्हता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यानंतर बीएसएफ जवानाची सुरक्षित सुटका करण्यासाठी राजनैतिक माध्यमांची मदत घेण्यात आली.
पाकिस्तानकडून टाळाटाळ
चुकून दुसऱ्या देशाच्या सीमेत प्रवेश करणे हा मोठा गुन्हा नाही. दोन्ही पक्षांना यापूर्वीही अशा परिस्थितीचा सामना करावा लागला आहे. बऱ्याचदा काही तासांतच एखाद-दुसऱ्या ध्वज बैठकीत असे प्रकरण मिटते. मात्र, यावेळी पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानबद्दल घेतलेल्या कडक भूमिकेमुळे बीएसएफ जवानाच्या वापसीला विलंब झाला, असे बीएसएफच्या माजी अधिकाऱ्यांनी सांगितले. ऑपरेशन सिंदूर नंतर भारताने पाकिस्तानला हिसका दाखवल्याप्रमाणे पाकिस्तानला बीएसएफ जवानाला सोडण्यास भाग पाडण्यात आले.
Comments are closed.