अझरबैजानमध्ये बदल घडवून आणण्याची तयारी
आर्मेनियाला भारत पुरविणार अत्याधुनिक यंत्रणा
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताचे रक्षण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आकाश हवाई सुरक्षा यंत्रणेमुळे पाकिस्तान आणि तुर्कियेचा मित्रदेश अझरबैजानची झोप उडाली आहे. नागार्नो-काराबाख युद्धात आर्मेनियावर मात केल्यावरही अझरबैजानचे सरकार सात्याने या देशाला धमकावत आहे. अझरबैजान हा देश तुर्किये आणि पाकिस्तानी शस्त्रास्त्रांच्या बळावर भारताचा मित्र देश आर्मेनियाला घाबरवू पाहत होते, परंतु आता आकाश क्षेपणास्त्र यंत्रणेमुळे या देशांना धडकी भरली आहे. भारत जुलै महिन्यात आकाश हवाई सुरक्षा यंत्रणेची दुसरी खेप आर्मेनियाला देणार आहे. भारत या क्षेत्रातील संघर्षात तेल ओतू पाहतोय, असा आरोप अझरबैजानने केला आहे.
भारत आणि आर्मेनिया दरम्यान 2022 मध्ये शस्त्रास्त्रांवरून मोठा करार झाला होता. आर्मेनियाने भारताकडून जमिनीवर आकाशात मारा करणाऱ्या हवाई सुरक्षा यंत्रणेच्या 15 युनिट्स खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. हा पूर्ण व्यवहार 60 अब्ज रुपयांचा होता. भारताकडुन आकाश प्रणाली खरेदी करणारा आर्मेनिया हा पहिला देश आहे. आकाश प्रणालीची निर्मिती भारत इलेक्ट्रॉनिक्सकडून करण्यात आली आहे. आकाश प्रणालीत 3डी इलेक्ट्रॉनिक स्कॅनिंग रडार लावण्यात आला आहे. आकाश प्रणालीच्या प्रत्येक बॅटरीत 4 लाँचर असतात आणि प्रत्येकात कमीतकमी 3 जमिनीवरून आकाशात मारा करणारी क्षेपणास्त्रं असतात.
भारताने नोव्हेंबर 2024 मध्ये आर्मेनियाला आकाश क्षेपणास्त्राची पहिली बॅटरी सोपविली होती. ही प्रणाली लढाऊ विमान, क्रूज क्षेपणास्त्र आणि आकाशातून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राला नष्ट करण्यास सक्षम आहे. याचबरोबर आकाश प्रणालीच्या मदतीने ड्रोनसमवेत अनेक हवाई लक्ष्यांना 25 किलोमीटरच्या उंचीपर्यंत नष्ट करता येऊ शकते. आकाश प्रणालीमुळे आर्मेनियाची हवाई सुरक्षा यंत्रणा मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.
तुर्कियेच्या सैन्यतज्ञाने केले मान्य
आकाश प्रणाली तांत्रिक स्वरुपात एक संरक्षणात्मक शस्त्र आहे. याच्या मदतीने हवाई क्षेत्राचे रक्षण केले जाऊ शकते. आकाश प्रणाली आर्मेनियाला हवाई आणि भूमीवरील लढाईत अत्यंत सहाय्यभूत ठरणार आहे. या प्रणालीमुळे आर्मेनिया सहजपणे स्वत:च्या भूभागाचे कुठल्याही हल्ल्यापासून रक्षण करू शकणार असल्याची कबुली तुर्कियेचे अझरबैजानमधील माजी डिफेन्स अताशे निवृत्त ब्रिगेडियर जनरल यूसेल कराउज यांनी दिली आहे. या भारतीय कवचामुळे आर्मेनिया शांतता चर्चा लांबवत आहे आणि स्वत:ची सैन्यसज्जता मजबूत करत असल्याचा आरोप अझरबैजानकडून करण्यात आला.
Comments are closed.