बुडत्या ‘पीसीबी’ला ‘आयसीसी’चा काडीचा आधार

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेसाठी (डब्ल्यूटीसी) बक्षिसांची रक्कम जाहीर केली असून विजेत्या संघाला 30.69 कोटी तर उपविजेत्या संघाला 18.47 कोटी रुपयांचे घसघशीत पुरस्कार दिले जाणार आहेत. पण या पुरस्कारांबरोबर सध्या रसातळाला गेलेल्या पाकिस्तानी क्रिकेट संघालाही कोटींचा पुरस्कार मिळणार असल्यामुळे बुडत्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डालाही (पीसीबी) कोटींचा आधार मिळणार आहे.

डब्ल्यूटीसीची फायनल येत्या 11 ते 15 जूनदरम्यान दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लॉर्ड्सवर खेळविली जाणार आहे. त्यासाठी आज आयसीसीने छप्पर फाड बक्षिसांची रक्कम जाहीर करून कसोटी क्रिकेटला स्फूर्ती देण्याचा प्रयत्न केला आहे.

आयसीसीने जाहीर केलेल्या बक्षिसांनुसार विजेत्या आणि उपविजेत्या संघांशिवाय इतर संघांनादेखील रक्कम दिली जाणार आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत पाकिस्तान शेवटच्या स्थानावर आहे, मात्र तरीही पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला आयसीसीकडून 4 लाख 80 अमेरिकन डॉलर्स म्हणजेच हिंदुस्थानी चलनानुसार चार कोटी रुपये मिळणार आहेत. टीम इंडियाने 2021 आणि 2023 मध्ये जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता, मात्र यावेळी हिंदुस्थानी संघाला न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्याविरुद्ध विजय मिळवता आला नाही. त्यामुळे हिंदुस्थानला तिसऱयांदा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यात अपयश आले. डब्ल्यूटीसीच्या गुणतालिकेत तिसऱया स्थानावर असल्याने हिंदुस्थानी संघाला 12.3 कोटी रुपये मिळतील

विजेत्या संघाला मिळणार 30.79 कोटी

ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. जो संघ विजेतेपद मिळवेल त्याला 30.79 कोटी रुपये मिळतील, तर उपविजेत्या संघाला 18.47 कोटी रुपये बक्षीस मिळणार आहे. यावेळी डब्ल्यूटीसी स्पर्धेतील विजेत्या संघाची बक्षीस रक्कम गेल्या दोन अंतिम सामन्यांमधील न्यूझीलंड (2021) आणि ऑस्ट्रेलिया (2023) या विजेत्यांनी जिंकलेल्या रकमेपेक्षा 17.96 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. गेल्या दोन पर्वामध्ये विजेत्याला 13.68 कोटी, तर उपविजेत्याला 6.84 कोटी रुपये देण्यात आले होते.

Comments are closed.