सराफाला बोलण्यात गुंतवून दागिने लांबवले

सराफाच्या दुकानात दागिने बघण्याचा बहाणा करत उगाचच सराफाला बोलण्यात गुंतवून दीड लाखाचे दागिने लंपास करून दोन महिला शिताफीने पसार झाल्या होत्या. पण नंतर त्यांची ही चालबाजी उघड झाल्यानंतर पोलिसांत तक्रार देण्यात आली. भांडुप पोलिसांनी अचूक तपास करीत त्या दोन्ही चोरी करणाऱ्या महिलांना शोधून काढत गजाआड केले. त्यातील एक महिला सराईत गुन्हेगार आहे.
भांडुप पश्चिमेकडील गाढव नाक्यावर असलेल्या लव गोल्ड प्रमिल निवास येथे मनोज जैन यांचे सराफाचे दुकान आहे. 19 मार्च रोजी दोन महिला त्यांच्या दुकानात आल्या होत्या. त्यांनी दागिने बघण्याचा बहाणा करीत जैन यांच्या मुलाला बोलण्यात गुंतवले. मग अचूक संधी साधत दोघींनी एक लाख 27 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केला होता. हा प्रकार समोर आल्यानंतर जैन यांनी भांडुप पोलिसांत चोरीची तक्रार दिली होती. त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गणेश सानप व त्यांच्या पथकाने तपास केला. नवी मुंबईतील महापे येथे येणार असल्याची माहिती मिळाली. महापे येथे सापळा रचून उषाबाई मकाळे (60) आणि लीलाबाई ढोकळे (62) अशा दोघींना पकडले. दोघीही जालना जिह्यातील रहिवासी आहेत.
Comments are closed.