चांगले केले! … मी तुझ्या शौर्याला सलाम करतो !!

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा श्रीनगर तळावरील जवानांशी संवाद : मनोबल उंचावण्याचा प्रयत्न

राजनाथ म्हणाले….

  • आम्ही फक्त बचाव करत नाही तर शत्रूराष्ट्रावर कारवाईही करतो
  • आम्ही शत्रूच्या छातीवर हल्ला करत दहशतवाद्यांना अद्दल घडवली
  • भारतीय सैनिकांच्या शौर्याला आता शत्रूराष्ट्रही कधी विसरणार नाही
  • सर्व देशवासियांच्या शुभेच्छा, प्रार्थना, कृतज्ञता तुमच्यासोबत आहेत

‘ऑपरेशन सिंदूर’ ही भारताने इतिहासातील दहशतवादाविरुद्ध केलेली सर्वात मोठी कारवाई आहे. गेल्या 35-40 वर्षांपासून भारत सीमापार दहशतवादाचा सामना करत आहे. आज भारताने संपूर्ण जगाला भारत दहशतवादाविरुद्ध कोणत्याही थराला जाऊ शकतो हे दाखवून दिले.

– राजनाथ सिंह, संरक्षणमंत्री

मंडळ/श्रीनगर

केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह गुरुवारी जम्मू काश्मीरच्या दौऱ्यादरम्यान श्रीनगरला पोहोचले आहेत. त्यांच्यासोबत नायब राज्यपाल मनोज सिन्हा देखील उपस्थित होते. याप्रसंगी त्यांनी लष्करी अधिकारी आणि सैनिकांची भेट घेत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. तसेच सीमेवर तैनात जवानांचे मनोबल वाढविण्याचा प्रयत्नही त्यांनी केला. जवानांशी संवाद साधताना संरक्षणमंत्र्यांनी ‘शाब्बास, ऑपरेशन सिंदूर मोहिमेत तुम्ही केलेल्या कार्याला सलाम ठोकायलाच हवा’ असे स्पष्ट केले.

संरक्षणमंत्री गुरुवारी काश्मीर खोऱ्यातील सैन्याचे नेतृत्व करणाऱ्या चिनार कॉर्प्सच्या मुख्यालयात पोहोचले होते. पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरनंतर राजनाथ सिंह यांचा जम्मू काश्मीरचा हा पहिलाच दौरा आहे. यापूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंजाबमधील आदमपूर एअरबेसवर पोहोचून हवाई दलाच्या जवानांची भेट घेत त्यांचे मनोबल वाढवले होते. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याव्यतिरिक्त जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा आणि मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी बदामी बाग छावणीत सैनिकांची भेट घेतली.

संरक्षणमंत्र्यांनी हवाई तळावरील भेटीप्रसंगी सैनिकांशी थेट संवाद साधला. तुम्ही ज्या पद्धतीने पाकिस्तानच्या चौक्या आणि दहशतवादी अ•s नष्ट केलात त्याच्या आठवणी पाकिस्तान कधीही विसरू शकणार नाही. संपूर्ण देशाच्या शुभेच्छा, प्रार्थना आणि कृतज्ञता तुमच्यासोबत आहेत. एका अर्थाने मी त्यांचा ‘पोस्टमन’ म्हणून आलो आहे. आम्ही केवळ बचावच करत नाही तर वेळप्रसंगी शत्रूराष्ट्रावर कठोर कारवाई देखील करतो, असे भारताने दाखवून दिले असल्याचे राजनाथ सिंह म्हणाले.

भारताने दहशतवादाविरुद्ध केलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे. दहशतवादाविरुद्ध आपण कोणत्याही थराला जाऊ शकतो हे आपण दाखवून दिले आहे. त्यांनी भारताच्या मेंदूवर हल्ला केला, पण आम्ही त्यांच्या छातीवर हल्ला केला, असा ‘वार’ही संरक्षणमंत्र्यांनी केला. श्रीनगर हवाई तळावर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी संवाद साधताना भारतीय हवाई दलाच्या  जवानांनी ‘वंदे मातरम्’ आणि ‘भारत माता की जय’ अशा घोषणा दिल्या.

हुतात्मा सैनिकांसह मृत नागरिकांना श्रद्धांजली

‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान ज्या शूर सैनिकांनी आपले प्राण अर्पण केले त्यांना मी सलाम करतो. पहलगाममध्ये मारल्या गेलेल्या निष्पाप नागरिकांच्या स्मृतींना मी श्रद्धांजली वाहतो. जखमी सैनिकांच्या धाडसाला मी सलाम करतो. या कठीण परिस्थितीत तुमच्यासोबत असल्याचा मला खूप अभिमान आहे. मी तुमचा संरक्षण मंत्री असलो तरी, त्याआधी मी भारताचा नागरिक आहे. एक नागरिक म्हणून मी तुमचे आभार मानण्यासाठी येथे आहे. जम्मू काश्मीरच्या लोकांनी दहशतवाद्यांबद्दल ज्या पद्धतीने आपला राग व्यक्त केला आहे त्यालाही मी सलाम करतो, असेही सिंह पुढे म्हणाले.

पाकिस्तानला मोठी किंमत मोजावी लागली

पंतप्रधान मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान पाकिस्तानला मोठी किंमत मोजावी लागली. आपल्या शौर्यामुळेच ही कारवाई यशस्वी झाली असून तुमच्यामुळे संपूर्ण देश अभिमानाने भरून गेला आहे. आम्हाला आमच्या सैन्याचा अभिमान आहे. ऑपरेशन सिंदूर ही दहशतवादाविरुद्धची एक मोठी कारवाई आहे. दहशतवादाविरुद्ध आपण कोणत्याही थराला जाऊ शकतो हे जगाने पाहिल्याचेही संरक्षणमंत्र्यांनी आपल्या संबोधनात नमूद केले.

Comments are closed.