'10 किलोचा सिलेंडर ही निव्वळ अफवा आहे.'
केंद्र सरकारला द्यावे लागले स्पष्टीकरण
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
येत्या काळात घरगुती एलपीजी सिलिंडरच्या बाबतीत मोठा बदल होणार असल्याची अफवा सोमवारी देशभर पसरली होती. घरगुती स्वरुपात वितरित होणाऱ्या 14.2 किलोग्रॅमच्या सिलिंडरमध्ये आता 10 किलोग्रॅम गॅस पुरवण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा देशात सुरू असताना केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने याबाबत सोमवारी सायंकाळी स्पष्टीकरण दिले. पेट्रोलियम कंपन्या 10 किलो वजनाचे सिलिंडर पुरविणार नसल्याचे पेट्रोलियम आणि गॅस मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी जाहीर केले आहे. सध्या सर्वत्र सुरू असलेली चर्चा केवळ अफवा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
इराणसोबतच्या युद्धामुळे गॅस पुरवठ्यात होणारा व्यत्यय आणि देशातील एलपीजीचा साठा झपाट्याने कमी होत असल्यामुळे 10 किलोचे सिलिंडर पुरविण्याबाबत विचार केला जात आहे. अहवालानुसार, तेल विपणन कंपन्या या निर्णयाद्वारे मर्यादित गॅसची उपलब्धता जास्तीत जास्त वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. उद्योग क्षेत्रातील अधिकाऱ्यांच्या मते, सध्याच्या परिस्थितीत हा एक आवश्यक उपाय असू शकतो, अशी अफवा सोमवारी सकाळपासून सर्वत्र पसरली होती.
सध्या गॅस सिलिंडर पुरवठ्याची परिस्थिती टंचाईच्या विळख्यात अडकलेली आहे. आखाती देशांकडून एलपीजीची नवीन खेप येत नसल्यामुळे पुरवठा साखळीत व्यत्यय आलेला आहे. अलीकडेच, होर्मुझच्या सामुद्रधुनीतून अंदाजे 92,700 टन गॅस घेऊन जाणारी केवळ दोन जहाजेच जाऊ शकली, जे देशाच्या एका दिवसाच्या वापराएवढे आहे. शिवाय, अनेक भारतीय एलपीजी टँकर पर्शियन आखातात अडकल्यामुळे अनिश्चितता आणखी वाढली आहे.
गॅस सिलिंडर पुरवठ्यात व्यत्यय
पेट्रोलियम मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, ग्राहकांना सध्या नियमित पुरवठा मिळत आहे, परंतु गॅस संवर्धनावर भर दिला जात आहे. देशात दररोज अंदाजे 93,500 टन एलपीजीचा वापर होतो, त्यापैकी सुमारे 86 टक्के घरगुती वापरासाठी वापरला जातो. भारत आपल्या एलपीजीच्या गरजेपैकी सुमारे 60 टक्के साठा आयात करतो. यातील बहुतेक भाग आखाती देशांकडून येतो. परिणामी, प्रादेशिक तणाव आणि पुरवठ्यातील व्यत्यय यांचा देशाच्या ऊर्जा प्रणालीवर थेट परिणाम होत आहे.
Comments are closed.