प्रत्येक घराला एक सिलिंडर दिला जाईल.
केंद्र सरकारची घोषणा, आफवांवर विश्वास नको
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारतात स्वयंपाकाच्या गॅसची कोणतीही टंचाई नसून, प्रत्येक ग्राहकाला त्याच्या घरी सिलिंडर देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे लोकांनी आफवांवर मुळीच विश्वास ठेवू नये आणि विनाकारण सिलिंडर घेण्यासाठी रांगा लावू नयेत, असे कळकळीचे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. पेट्रोलियम विभागाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी निवेदनाद्वारे मंगळवारी हे दिलासादायक आवाहन केले.
लोकांनी विनाकारण भयभीत होऊ नये. त्यांना भयभीत करण्याचा प्रयत्न काही लोकांकडून केला जात आहे. तथापि, लोकांनी अशा अफवांवर मुळीच विश्वास ठेवू नये. स्वयंपाकाच्या गॅसचे कोणतेही संकट नाही. ग्राहकाने सिलिंडरसाठी बुकिंग केल्यानंतर त्याला योग्य वेळत सिलिंडर घरपोच केला जाईल. सरकारने ती व्यवस्था केली आहे. मात्र, लोकांनी सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन स्वयंपाकाच्या गॅसचा उपयोग दक्षतापूर्वक आणि नासाडी न करता करण्याचा प्रयत्न करावा. तसेच ज्यांना शक्य आहे, त्यांनी पीएनजीचा उपयोग करण्याचा प्रारंभ करावा. गडबड आणि गोंधळ करण्याचे काहीही कारण नाही, असे या निवेदनात स्पष्ट करण्यात आले.
साठेबाजांविरोधात कठोर कारवाई
सध्याच्या विशिष्ट स्थितीचा गैरफायदा उठविण्यासाठी गॅस सिलिंडरांची साठेबाजी केली जाण्याच्या घटनांची नोंद सरकारने घेतली आहे. अशी बेकायदेशीर साठेबाजी करणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे उत्तरदायित्व राज्य सरकारांचे आहे. जेथे हे उत्तरदायित्व केंद्र सरकारचे आहे, तेथे कठोर कारवाई करण्यासाठी त्वरेने पावले उचलण्यात आली आहेत. पेट्रोलियम विभागाला प्राप्त झालेल्या माहितीनुसार आतापर्यंत देशभरात 12 हजार स्थानी धाडी घालण्यात आल्या असून 15 हजार भरलेले सिलिंडर जप्त करण्यात आले आहेत. दिल्लीत गेल्या दोन दिवसांमध्ये 600 सिलिंडर जप्त करण्यात आले. तर उत्तर प्रदेशात 450 धाडी टाकण्यात आल्या आहेत. तसेच 10 साठेबाजांना अटक करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये 564 एफआयआर सादर करण्यात आले असून अनेक लोकांच्याविरोधात कारवाई केली जात आहे, तसे त्यांनी स्पष्ट केले.
परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांचे प्रयत्न
गॅस आणि तेल यांच्या परिस्थितीसंबंधी भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न चालविले आहेत. या प्रयत्नांची माहिती परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी मंगळवारी पत्रकारांना दिली. ब्रुसेल्स येथे नुकत्याच झालेल्या एका आंतरराष्ट्रीय परिषदेत जयशंकर यांनी भाग घेतला. या परिषदेत इंधनासंबंधीच्या जागतिक परिस्थितीवर विचार करण्यात आला. भारताने तेल आणि इंधन वायूचा पुरवठा सुरळीत आणि अखंड रहावा, म्हणून पर्यायी स्रोत आणि पर्यायी मार्ग यांचा शोध घेतला असून त्याचे परिणाम येत्या काही दिवसांमध्ये दिसणार आहेत. विविध देशांकडून भारत कच्चे इंधन तेल आणि इंधन वायूची खरेदी करत आहे. तसेच हे तेल आणि वायू होर्मुझची सामुद्रधुनी टाळून भारतात आणण्यासाठी पर्यायी सागरी मार्गांचा शोध घेतला जात आहे. त्यामुळे कोणीही चिंता करु नये. केंद्र सरकार शक्य ते सर्व प्रयत्न योग्य मार्गांनी करत आहे. सर्वांनी धीराने परिस्थिती हाताळावी, असे आवाहन करण्यात आले.
भारताच्या सर्व नौका सुरक्षित
आखाती क्षेत्रात असणाऱ्या भारताच्या सर्व नौका आणि नाविक सुरक्षित आहेत. गेल्या दोन दिवसांमध्ये विविध देशांमधील 161 नाविकांना सुखरुपपणे भारतात आणले गेले आहे. जवाहरलाल नेहरु बंदराच्या मार्गावर 450 कंटेनर पडून आहेत, अशी अफवा कोणीतरी उठविली आहे. मात्र, तशी कोणतीही परिस्थिती नाही. 18 मार्चला (बुधवारी) परराष्ट्र व्यवहार स्थायी समितीची बैठक होणार असून या बैठकीत पुढची रणनीती निर्धारित होईल, अशी माहितीही देण्यात आली आहे.
काय म्हणते केंद्र सरकार…
ड कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, गॅसच्या टंचाईची स्थिती नाही
ड प्रत्येक ग्राहकाने नेहमीच्या पद्धतीने बुकिंग करावे, रांगा लावणे टाळावे
ड प्रत्येकाने स्वयंपाकाच्या गॅसचा उपयोग जपून आणि दक्षतेने करणे योग्य
ड भारताच्या आखातातल्या सर्व वाहतूक नौका सुरक्षित, नाविकही सुखरुप
Comments are closed.