आशिया कपमध्ये ‘या’ खेळाडूला संधी न दिल्याने संजय मांजरेकर भडकले, जाणून घ्या नक्की काय म्हणाले?
आशिया कप 2025 (Asia Cup 2025) साठी भारतीय संघाची घोषणा झाल्यापासून श्रेयस अय्यरला (Shreyas iyer) संघात स्थान न दिल्याबद्दल सातत्याने प्रश्न उपस्थित होत आहेत. अनेक भारतीय दिग्गजांच्या मते, या संघात अय्यरला नक्कीच संधी मिळायला हवी होती. मात्र त्याला वगळणे हा त्याच्यासोबत अन्याय आहे. आता माजी खेळाडू आणि समालोचक संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनीदेखील अय्यरला संधी न दिल्याबद्दल बीसीसीआयच्या निवड प्रक्रियेवर थेट प्रश्न उपस्थित केले आहेत.
सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar yadav) नेतृत्वाखाली 15 सदस्यीय भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. तर कसोटी संघाचा कर्णधार शुबमन गिलला या संघात उपकर्णधार करण्यात आलं आहे. त्यामुळे अय्यरला बाहेर बसावं लागलं.
गेल्या काही वर्षांत श्रेयस अय्यरने आपल्या खेळात मोठे बदल केले आहेत. शॉर्ट-पिच चेंडूवर असलेली आपली कमजोरी त्याने सुधारली असून आता तो केवळ फिरकी गोलंदाजांवर अवलंबून नाही. आयपीएल 2025 मध्ये त्याने जबरदस्त कामगिरी करत आपल्या संघाला अंतिम फेरीत पोहोचवलं. त्यामुळे अय्यरला दुर्लक्षित करणं योग्य नाही, असं मांजरेकरांचं मत आहे.
मांजरेकर यांनी इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करून सांगितलं, हे मी फक्त अलीकडे नाही, तर काही वर्षांपासून पाहत आलो आहे. निवडकर्त्यांची ही सवय की, एखाद्या खेळाडूला एका फॉरमॅटमध्ये केलेल्या कामगिरीच्या आधारावर दुसऱ्या फॉरमॅटमध्ये संधी देणे. उदाहरणार्थ, कसोटी क्रिकेटमध्ये चांगलं खेळल्यामुळे त्याला थेट टी20 संघात स्थान देणं मला अजिबात पटत नाही. हा निर्णय म्हणजे पूर्णपणे क्रिकेटच्या तर्काच्या पलीकडचा आहे.
अय्यरला संधी न देणं चकित करणारं असल्याचंही मांजरेकर म्हणाले, त्याला यापूर्वी योग्य कारणाने भारतीय संघातून वगळलं होतं, कारण तो देशांतर्गत क्रिकेटकडे तितका लक्ष देत नव्हता. पण या गोष्टीचा अय्यरवर चांगला परिणाम झाला. तो जेव्हा इंग्लंडमध्ये परतला, तेव्हा त्याने जेवढं उत्तम फलंदाजीचं प्रदर्शन केलं, ते आधी कधीच पाहिलं नव्हतं.
ते पुढे म्हणाले, त्याने पुनरागमन मालिकेत एकही चूक केली नाही. त्याच फॉर्मला त्याने आयपीएलमध्येही कायम ठेवलं. संपूर्ण आयपीएल हंगामात 50 पेक्षा जास्त सरासरी, 170 पेक्षा जास्त स्ट्राइक रेट आणि सामन्यात गेम-चेंजर अशी भूमिका असलेला दुसरा कोणताही फलंदाज नव्हता. तरीदेखील त्याला गैर-निवडीचं बक्षीस मिळालं.
मांजरेकरांचा पुढचा संदेश स्पष्ट होता, निवड करताना टी20 मध्ये प्रत्यक्षात चांगलं खेळणाऱ्या खेळाडूंना संधी द्या. केवळ कुणी कसोटी क्रिकेटमध्ये चांगलं केलं म्हणून त्याला टी20 मध्ये स्थान देऊ नका. विशेषत श्रेयस अय्यर सारख्या खेळाडूला डावलून.
Comments are closed.