IND vs SA: गुवाहाटी कसोटीत भारतीय संघाची निराशाजनक कामगिरी! 30 वर्षात न घडलेल्या लाजिरवाण्या रेकॉर्डची नोंद होणार?
भारत आणि दक्षिण (IND vs SA) आफ्रिकेमधील दोन सामन्यांची कसोटी मालिकेला आता रोमांचक वळण आले आहे. कोलकात्यात झालेल्या पहिल्या कसोटीमध्ये दक्षिण आफ्रिकेने उत्कृष्ट विजय मिळवत आघाडी घेतली होती. आता दुसऱ्या कसोटीमध्येही आफ्रिकी संघ मजबूत स्थितीत आहे आणि टीम इंडिया (Team india) मोठ्या अडचणीत सापडली आहे.
गुवाहाटीत सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीमध्ये आफ्रिकी संघाने भारतासमोर 549 धावांचे लक्ष्य ठेवलं आहे. अशा परिस्थितीत भारताला पराभवापासून वाचवण्यासाठी एखाद्या चमत्काराचीच गरज आहे. त्याचबरोबर जवळपास 30 वर्षांपूर्वीचा एक जुना विक्रम तुटण्याच्या उंबरठ्यावर असून त्यामुळे टीम इंडियाच्या नावावर एक मोठा कलंक लागू शकतो.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या कसोटी मालिकेत भारतीय फलंदाजांची कामगिरी अत्यंत खराब राहिली आहे. ना कोलकाता कसोटीमध्ये कोणी मोठी खेळी करू शकला, ना गुवाहाटीच्या पहिल्या डावात धावा निघाल्या. या मालिकेत अद्याप एकाही भारतीय खेळाडूला शतक करता आलेले नाही.
आता जर दुसऱ्या डावातही कोणत्याही भारतीय फलंदाजाने शतक झळकावले नाही, तर जवळपास 30 वर्षांत पहिल्यांदाच भारतात खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेत एकही भारतीय फलंदाज शतक करू शकला नाही, अशी लाजीरवाणी नोंद होईल. टीम इंडिया या शर्मनाक विक्रमापासून वाचण्याचा प्रयत्न करेल.
कसोटीचा चौथा दिवस सुरू होताच पिचवर फिरकीपटूंचे वर्चस्व वाढले आहे. सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना मदत मिळत होती, आता स्पिनर्सही चेंडू मोठ्या प्रमाणात फिरवत आहेत. अशा स्थितीत विजय तर दूरच, एक शतक होण्याची आशाही अत्यंत क्षीण दिसत आहे. कोलकाता कसोटीमध्ये भारतीय संघ पहिल्या डावात 189 धावांवर गडगडला होता आणि दुसऱ्या डावात केवळ 93 धावाच करू शकला.
त्याचप्रमाणे गुवाहाटी कसोटीच्या पहिल्या डावातही भारत फक्त 201 धावाच करू शकला. यशस्वी जयस्वाल (Yashsvi jaiswal) सोडला, तर अद्याप कोणत्याही भारतीय फलंदाजाला 50 धावांचाही टप्पा गाठता आलेला नाही. त्यामुळे चौथ्या डावात शतक होण्याची शक्यता अत्यंत कमी दिसत आहे.
Comments are closed.