स्वस्तात म्हाडाचे घर देतो सांगत चालकाची आर्थिक फसवणुक, दोघा आरोपींना अटक

चुनाभट्टी येथे 15 लाखांत म्हाडाची रुम मिळवून देतो अशी बतावणी करत धारावीत राहणाऱ्या एका कार चालकाची आर्थिक फसवणूक करणाऱ्या दोघांना रफिक अहमद किडवाई मार्ग पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या आहेत. या दोघांनी अशाप्रकारे अनेकांची फसवणूक केल्याचा संशय असून पोलिस अधिक चौकशी करत आहेत.

शिवकुमार चव्हाण (45) आणि अभिनय कांबळे अशी अटक केलेल्या दोघा आरोपींची नावे आहेत. शिवकुमार शिवडी परिसरात राहतो आणि तेथेच समाजसेवक म्हणून काम करतो. धारावी येथे राहणारे कार चालक चंद्रकांत काबले यांना नवीन घर घ्यायचे असल्याचे ते कमी किंमतीत कुठे घर मिळते का त्याचा शोध घेत होते. तेव्हा चंद्रकांत यांची ओळख शिवकुमार याच्याशी झाली. मग शिवकुमार आणि अभिनय यांनी चुनाभट्टी येथे चंद्रकांत यांना म्हाडाची खोली दाखवली. ओळखीवर स्वस्तात घर मिळवून देऊ असे सांगत दोघांनी चंद्रकांत यांच्याकडून 15 लाख 27 हजार रुपये घेतले. त्यानंतर दोघांनी चंद्रकांत यांना टाळण्यास सुरुवात केली. आपली फसवणूक झाल्याचे कळताच चंद्रकांत यांनी रफी अहमद किडवाई मार्ग पोलिसांत तक्रार दिली. आरोपींनी शिवकुमार याच्या शिवडी येथील कार्यालयात पैशांचा व्यवहार केला होता. त्यामुळे वरिष्ठ निरीक्षक विनोद तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नागरगोजे व पथकाने तत्काळ तपास सुरू करून शिवकुमार आणि अभिनव या दोघांना अटक केली.

Comments are closed.