पंजाबमध्ये माजी आयजीने आत्महत्येचा प्रयत्न केला.
स्वत:वर झाडली गोळी : 12 पानी सुसाईड नोट हस्तगत : 8.10 कोटींच्या ऑनलाइन फसवणुकीचा उल्लेख
वृत्तसंस्था/ पटियाला
पंजाबमधील माजी आयपीएस अधिकारी अमर सिंग चहल यांनी सोमवारी पटियाला येथे रिव्हॉल्व्हरने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ते ‘आयजी’ म्हणजेच पोलीस महानिरीक्षक पदावरून निवृत्त झाले होते. त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून एक सुसाईड नोट हस्तगत केली असून त्यामध्ये ऑनलाइन फसवणुकीमुळे झालेल्या आर्थिक नुकसानीचा उल्लेख सापडला आहे. 2015 मध्ये फरीदकोटच्या कोटकपुरा येथे गुरु ग्रंथ साहिबच्या अपवित्रतेविरुद्ध निदर्शने करणाऱ्या शीख भाविकांवर झालेल्या पोलीस गोळीबार प्रकरणात अमर सिंग चहल हे आरोपी आहेत.
निवृत्त आयजी अमर सिंग चहल यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्यासंबंधीची माहिती त्यांच्या मित्रांकडून प्राप्त झाल्याची माहिती पटियाला पोलिसांनी दिली. घटनेची माहिती मिळताच एसएचओ आणि डीएसपींसह वरिष्ठ अधिकारी त्यांच्या घरी पोहोचले. याप्रसंगी चहल हे तेथे जखमी अवस्थेत आढळले. पोलिसांनी तातडीने त्यांना रुग्णालयात आणले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती अजूनही गंभीर असल्याचे सांगण्यात आले. आम्हाला घटनास्थळावरून एक सुसाईड नोट सापडली असून त्याआधारे, एफआयआर नोंदवला जाईल आणि प्रकरणाची चौकशी केली जाईल, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. चहल यांच्या छातीत गोळी लागली होती. हे प्रकरण कोट्यावधी रुपयांच्या सायबर फसवणुकीशी जोडलेले असल्याचे वृत्त आहे.
Comments are closed.