'प्रत्येक कुटुंबासाठी नोकरी', आरजेडीची घोषणा
'माझे कार्य बिहार आहे, माझा धर्म बिहारी आहे' हा घोषवाक्य
वृत्तसंस्था/पाटणा
बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी आणखी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. तेजस्वी यांनी सरकारी नोकरीच्या मुद्द्याला केंद्रस्थानी ठेवत जनतेला मोठे आशासन दिले आहे. राज्यात आमचे सरकार सत्तेवर आल्यास प्रत्येक घरात एक सरकारी नोकरी मिळवून देणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे.निवडणुकीचा शंखनाद झाला असून आमच्या घोषणांची नक्कल नितीश कुमार सरकार करत आहे. 20 वर्षे जुन्या या ‘खटारा’ सरकारला बेरोजगारी सर्वात मोठा मुद्दा असल्याचे माहितच नव्हते.
आम्ही 17 महिन्यांमध्ये लोकांना नोकरी मिळवून दिली. आता नितीश कुमार बेरोजगारी भत्ता देण्याचे आश्वासन देत आहेत. सामाजिक न्यायानंतर आता आर्थिक न्याय होईल आणि नोकऱ्यांची निर्मिती केली जाणार असल्याचा दावा तेजस्वी यादव यांनी केला. नितीश कुमार यांच्या 20 वर्षांच्या सरकारने प्रत्येक घराला भय दिले, आम्ही आता प्रत्येक घराला सरकारी नोकरी देऊ. या एका पावलामुळे नोकरीशी संबंधित प्रत्येक कमतरता आपोआप दूर होईल. प्रत्येक घरात किमान एक नोकरी देण्याकरता आम्ही सर्वेक्षण करविले असून जे होऊ शकते ते आम्ही करू असा माझा निर्धार असल्याचे तेजस्वी यादव यांनी म्हटले आहे.
संजदची प्रतिक्रिया
तेजस्वी यादव आणि महाआघाडीला आगामी निवडणुकीत मोठा पराभव होणार असल्याची जाणीव असल्याची टीका संजदचे प्रवक्ते अभिषेक झा यांनी केली आहे. नितीश कुमार यांनी यापूर्वीच बिहारच्या जनतेला योजनांच्या अंतर्गत सर्व लाभ दिले आहेत. आता जमिनीच्या बदल्यात कुणीच नोकरी मिळवू इच्छित नसल्याची उपरोधिक टीका झा यांनी केली.
20 दिवसांत कायदा
राजद नेत्याने हे आश्वासन केवळ घोषणा नव्हे तर आमचे वचन असल्याचे वक्तव्य पेले आहे. बिहारमध्ये आता नोकऱ्यांचे नवजागरण होणार आहे. बिहारच्या ज्या परिवाराकडे सरकारी नोकरी नाही, अशा प्रत्येक परिवाराला एक नवा कायदा लागू करत अनिवार्य स्वरुपात त्या परिवारात नोकरी दिली जाईल. सरकार स्थापन होण्याच्या 20 दिवसांत कायदा आणू आणि 20 महिन्यांच्या आत बिहारमध्ये प्रत्येक घरात सरकारी नोकरी असेल, असा दावा तेजस्वी यादव यांनी केला.
Comments are closed.