‘महादेवी’ला परत पाठवण्यासाठी 48 तासांत सव्वा दोन लाख स्वाक्षरींचे पत्र राष्ट्रपतींकडे रवाना
शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील स्वस्तिश्री भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठातील महादेवी हत्तीणीला परत पाठवण्यासाठी 48 तासांत तब्बल सव्वादोन लाखांहून अधिक नागरिकांनी स्वाक्षरी केलेले पत्रांचे गठ्ठे आज पोस्ट विभागामार्फत राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्याकडे पाठविण्यात आले. दरम्यान, महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी आश्वासन देण्याऐवजी किती दिवसांत महादेवी परत येणार, हे ठोसपणे जनतेसमोर जाहीर करावे, अशी मागणी आमदार सतेज पाटील यांनी केली आहे.
नांदणी येथील स्वस्तिश्री भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठातील महादेवी हत्तीणीला सर्वोच्च न्यायालयाचा आदेश दाखवत हजारो नागरिकांचा विरोध डावलून गुजरात येथील वनतारा पशुसंवर्धन केंद्रात नेण्यात आले. यानंतर विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी याला जोरदार विरोध करत, महादेवीला पुन्हा कोल्हापुरात आणण्यासाठी स्वाक्षरींची मोहीम सुरू केली होती. या मोहिमेत केवळ 48 तासांत तब्बल सव्वादोन लाखांहून अधिक नागरिकांनी स्वाक्षरी करून, महादेवीला पूर्ववत नांदणी येथील मठात सोडण्याची मागणी केली आहे.
मठाचे महास्वामीजी यांच्या हस्ते या गठ्ठय़ांचे पूजन झाल्यानंतर दुपारी आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते रमणमळा येथील पोस्ट कार्यालयामध्ये हे सर्व अर्ज राष्ट्रपती महामहीम द्रौपदी मुर्मू यांना पाठवण्यात आले. राष्ट्रपतींनी यामध्ये लक्ष घालून महादेवी हत्तीण परत यावी, यासाठी हस्तक्षेप करावा, अशी मागणीही आमदार सतेज पाटील यांनी केली. यावेळी माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह जैन समाजातील बांधव मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
सत्ताधाऱ्यांनी फक्त आश्वासन देऊ नये – आमदार सतेज पाटील
‘वनतारा’चे सीईओ शुक्रवारी कोल्हापुरात आले होते. याची कल्पना विरोधी आमदारांना दिली गेली नसल्याने यावर आमदार सतेज पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. सत्ताधारी आमदार आणि खासदारांसोबत ‘वनतारा’च्या सीईओंसोबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. विरोधी पक्ष म्हणून जनतेच्या भावना आम्ही सरकारपर्यंत पोहोचवण्याचे काम केले आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनीच आता महादेवी हत्तीण परत आणण्यासाठी केवळ आश्वासने न देता, किती दिवसांत हत्तीण परत येणार हे जाहीर करावे, अशी मागणीही त्यांनी केली.
‘महादेवी’साठी जयसिंगपुरात मूक मोर्चा
गुजरातमधील ‘वनतारा’कडे सुपूर्द केलेल्या नांदणी (ता. शिरोळ) येथील महादेवी (माधुरी) हत्तीणीचा ताबा परत स्वस्तिश्री जीनसेन भटारक पट्टाचार्य महास्वामी मठाकडे द्यावा, यासाठी जयसिंगपुरात सर्वधर्मीय आणि सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात आला. यानंतर पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांना निवेदन देण्यात आले.
शनिवारी सकाळी गल्ली क्रमांक चार येथील श्री पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर येथून मूक मोर्चाला प्रारंभ झाला. मोर्चात सहभागी झालेल्यांनी काळी फीत लावून या घटनेचा निषेध केला. हा मूक मोर्चा स्टेशन रोड, गांधी चौक, क्रांती चौकमार्गे, गल्ली क्रमांक 13 मधून विक्रमसिंहराजे क्रीडांगणावर पोहोचला. मोर्चात माजी नगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर, दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील, सावकार मादनाईक, गोवर्धन दबडे, संभाजी मोरे, सुनील पाटील-मजलेकर, दादा पाटील-चिंचवडकर चंद्रकांत जाधव-घुणकीकर यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी ग्रामस्थ, मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.
Comments are closed.