पाकिस्तान उघडकीस आणण्यासाठी एक मास्टर प्लॅन
सर्वपक्षीय पथके जगभर पाठविणार : विविध देशांमध्ये खासदार करणार शत्रूराष्ट्राची पोलखोल
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पाकिस्तान आणि त्याचा दहशतवाद यांना जगभर उघडे पाडण्याची महायोजना भारताने सज्ज केली आहे. या योजनेच्या अंतर्गत भारत सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची पथके जगातील सर्व महत्वाच्या देशांमध्ये पाठविणार असून पाकिस्तान कशाप्रकारे दहशतवादाला प्रोत्साहन देत आहे, हे पुराव्यानिशी मांडले जाणार आहे. 22 मे पासून या अभियानाचा प्रारंभ करण्यात येणार असून ते 10 दिवस चालणार आहे.
केंद्र सरकार पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी बहुपक्षीय शिष्टमंडळाला विदेशात पाठविण्याची तयारी करत आहे. भारताकडून पाठविल्या जाणाऱ्या प्रतिनिधीमंडळांमध्ये देशातील सर्व महत्त्वाच्या राजकीय पक्षांचे लोकप्रतिनिधी असतील. पाच ते सहा लोकप्रतिनिधींचा एक गट असेल. असे अनेक गट केले जाणार असून त्यांना विविध देशांच्या दौऱ्यावर पाठविण्यात येणार आहे. या देशांच्या प्रमुख नेत्यांना ही प्रतिनिधीमंडळे भेटणार असून त्यांच्यासमोर पाकिस्तान विरोधातील पुरावे सादर केले जाणार आहेत.
पाकिस्तानला एकाकी पाडणार
पाकिस्तानला जगात एकाकी पाडण्यासाठी ही योजना साकारण्यात आली आहे. पाकिस्तान कशाप्रकारे दहशतवादाच्या माध्यमातून भारताला आणि जगालाही संकटात टाकत आहे आणि त्यातून कोणत्या प्रकारच्या गंभीर समस्या केवळ भारतासमोरच नव्हे, तर जगासमोर उद्भवणार आहेत, हे प्रमुख देशांच्या प्रमुख नेत्यांना पुराव्यांचा आधारावर आणि नेमकेपणाने पटवून दिले जाणार आहे.
आठ गट निर्माण करणार
या अभियानाच्या प्रथम टप्प्यात लोकप्रतिनिधींचे आठ गट विविध देशांचा दौरा करणार आहेत. हा दौरा 10 दिवसांचा असेल. प्रत्येक गटात 5 ते 6 खासदार असतील. तसेच प्रत्येक गटात भारताच्या परराष्ट व्यवहार विभागाचा एक अधिकारी आणि केंद्र सरकारचा एक प्रतिनिधी यांचाही समावेश असेल.
काँग्रेसचा होकार
आपला पक्ष निश्चितपणे या अभियानात सहभागी होईल, असे प्रतिपादन काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी केले आहे. हा देशाचा प्रश्न आहे. पाकिस्तानचा दहशतवाद साऱ्या जगासमोर येणे आवश्यक आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या या योजनेत आम्ही मोकळ्या मनाने सहभागी होणार आहोत. आम्ही केंद्र सरकारच्या सिंदूर अभियानाला पूर्ण पाठिंबा व्यक्त केला होता, असे त्यांनी स्पष्ट केले.
शशी थरुरना मिळणार मोठी कामगिरी
काँग्रेसचे थिरुवनंतपुरमचे लोकसभा सदस्य शशी थरुर यांनी सिंदूर अभियानाचे समर्थन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रशंसा केल्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजीची भावना आहे. थरुर यांनी ‘लक्ष्मणरेषा’ ओलांडली आहे, असा इशारा त्यांना काँग्रेस श्रेष्ठींकडून देण्यात आला होता. याच थरुर यांना केंद्र सरकारच्या या पाकिस्तानविरोधी अभियानात महत्त्वाची भूमिका सरकारकडून दिली जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती नजीकच्या सूत्रांकडून देण्यात आली.
महत्त्वाचे प्रतिनिधी कोण असतील…
विविध पक्षांमधील काही लोकसभा सदस्यांची निवड या अभियानासाठी करण्यात आली आहे. त्यांच्यात समित भट्टाचार्य, अनुराग ठाकूर (भाजप), मनिष तिवारी (काँग्रेस), अमर सिंग (समाजवादी पक्ष), प्रियांका चतुर्वेदी (शिवसेना ठाकरे गट), संबीत पात्रा (भाजप), सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट), श्रीकांत शिंदे (शिवसेना), शशी थरुर (काँग्रेस), डी. पुरंदेश्वरी (भाजप) आदी मान्यवरांचा समावेश आहे. लोकसभा आणि राज्यसभा अशा दोन्ही संसदीय सभागृहांमधील सदस्यांचा या अभियानात समावेश केला जाईल. त्यांना योग्य त्या सूचनाही दिल्या जातील.
एक ऐतिहासिक आठवण
भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी विविध देशांमध्ये, महत्त्वाच्या प्रसंगी संसद सदस्यांची प्रतिनिधीमंडळे पाठविण्याची परंपरा जुनी आहे. 1994 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव मोठ्या प्रमाणात वाढला होता. जम्मू-काश्मीरमध्ये मानव अधिकारांचा भंग होत आहे, असा कांगावा पाकिस्तानने जगभरात चालविला होता. हा प्रश्न संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार आयोगासमोर मांडण्याची तयारी त्याने चालविली होती. त्यावेळचे नेते पी. व्ही. नरसिंह राव यांनी भारताचे या आयोगासमोर प्रतिनिधित्व करण्यासाठी त्यावेळचे विरोधी पक्षनेते अटलबिहारी वाजपेयी यांची नियुक्ती केली होती. वाजपेयी यांनी त्यावेळी भारताच्या प्रतिनिधिमंडळाचे नेतृत्व आयोगासमोर केले होते.
सर्वपक्षीय खासदारांचा समावेश…
ड पाकिस्तानचा दहशतवाद जगासमोर मांडण्यासाठी भारताची व्यापक योजना
ड लोकसभा आणि राज्यसभा यांच्या सर्वपक्षीय सदस्यांचे गट निवडले जाणार
ड हे गट विविध देशांच्या प्रमुखांना भेटी देऊन पाकिस्तानचा पर्दाफाश करणार
ड प्रत्येक गटात भारताच्या परराष्ट्र विभागाचा एक ज्येष्ठ अधिकारी असणार
Comments are closed.