येत्या आठवडाभरात भाजपच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवड होणार आहे.
नितीन नबीन प्रमुख दावेदार : बऱ्याच प्रतिक्षेनंतर निवडणुकीची तारीख जाहीर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी निवडणुकीची तारीख निश्चित झाली आहे. भाजपाध्यक्ष निवडणुकीसाठी नामांकन प्रक्रिया 19 जानेवारी रोजी पूर्ण होईल. त्यानंतर मतदान आणि निकालांची औपचारिक घोषणा 20 जानेवारी रोजी होणार आहे. तथापि, निवडणूक बिरविरोध झाल्यास 19 तारीखलाच नव्या भाजपाध्यक्षांच्या नावाची घोषणा केली जाऊ शकते. सद्यस्थितीत भाजपचे कार्यकारी अध्यक्ष नितीन नबीन हे राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी सर्वात प्रबळ दावेदार मानले जातात. निवडणूक अधिकाऱ्यांसमोर उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर अन्य कोणताही अर्ज न आल्यास त्यांची बिनविरोध निवड होणार आहे.
निवडणुकीची सर्व तयारी जवळजवळ पूर्ण झाली असून संघटनात्मक पातळीवर एकमत झाले आहे. ही निवडणूक केवळ औपचारिकता राहू शकते.निवडणूक प्रक्रियेत पक्षाचे वरिष्ठ नेते सक्रिय भूमिका बजावतील. वृत्तानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह संघटना आणि सरकारमधील 10 वरिष्ठ नेते प्रस्तावक म्हणून नामांकन पत्रांवर स्वाक्षरी करतील. नितीन नबीन हे सध्या भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत आणि पक्ष संघटनेत त्यांच्या कार्यक्षमतेसाठी आणि अनुभवासाठी ओळखले जातात. त्यांच्याकडून अध्यक्षपदासाठी अर्ज सादर केला जाणार आहे.
नितीन नबीन यांची अलिकडेच पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून 15 डिसेंबर 2025 पासून त्यांची नियुक्ती झालेली आहे. यापूर्वीच्या परंपरेनुसार कार्यकारी अध्यक्षांना नंतर पूर्णवेळ राष्ट्रीय अध्यक्षाची जबाबदारी दिली जाते. म्हणूनच त्यांचे नाव आघाडीचे उमेदवार मानले जात आहे. नबीन हे लवकरच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. न•ा यांच्या जागी विराजमान होतील.
नितीन नबीन भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करतील. त्यांच्या उमेदवारीच्या प्रस्तावकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह आणि अनेक केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्री यांचा समावेश आहे. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी फक्त नितीन नबीनच अर्ज दाखल करतील आणि त्यांच्याविरुद्ध इतर कोणताही नेता अर्ज दाखल करणार नाही, असे सूत्रांकडून समजते.
भाजपच्या सर्व मुख्यमंत्र्यांना दिल्लीत बोलावले
निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यावर केंद्रीय मंत्री, भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री, पक्षाचे वरिष्ठ राष्ट्रीय पदाधिकारी, राज्य युनिट अध्यक्ष आणि पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य देखील अध्यक्ष निवडणुकीत सहभागी होतील. प्रस्तावक आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्यांच्या स्वाक्षऱ्यांसह नितीन नबीन यांच्यासाठी अनेक नामांकन पत्रे तयार करण्याची तयारी सुरू आहे. आता 19 ते 22 जानेवारीदरम्यान भाजपच्या देशातील सर्व मुख्यमंत्र्यांना आमंत्रित करण्यात आले असून पक्षीय बैठकींचा सिलसिला सुरू राहणार आहे. नवनियुक्त राष्ट्रीय अध्यक्षांचे स्वागत आणि मार्गदर्शनही या काळात होणार आहे.
Comments are closed.