टीम इंडियाच्या जर्सी स्पॉन्सरशिपबाबत बीसीसीआयकडून मोठी अपडेट समोर, ड्रीम 11 नंतर कोण ठरेल नवा स्पॉन्सर?
ऑनलाईन गेमिंगवरील संशोधनानंतर बीसीसीआय (BCCI) आणि ड्रीम 11 यांच्यातील करार संपुष्टात आला. त्यामुळे भारतीय संघाला आशिया कप 2025 (Asia Cup 2025) मध्ये जर्सी स्पॉन्सरशिवाय उतरावं लागलं. बीसीसीआयने नवीन जर्सी स्पॉन्सरसाठी टेंडर काढलं आहे. या संदर्भात बीसीसीआयने मोठी अपडेट दिली आहे, ज्यामध्ये टीम इंडियाला नवा जर्सी प्रायोजक कधीपर्यंत मिळेल हे स्पष्ट करण्यात आलं आहे. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं.
राजीव शुक्ला (Rajiv Shukla) म्हणाले, जर्सी स्पॉन्सरशिपसाठी प्रक्रिया सुरू आहे आणि यात अनेक स्पॉन्सर सहभागी आहेत. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आम्ही अधिकृत घोषणा करू. मला वाटतं की पुढील 15-20 दिवसांत अंतिम निर्णय घेतला जाईल. सध्या कोणाचंही नाव निश्चित झालेलं नाही. अनेक कंपन्या यात रस दाखवत आहेत. अंतिम निर्णयानंतर आम्ही सर्वांना कळवू.
बीसीसीआयला करमाफी मिळते अशी टीका होत असल्यावर राजीव शुक्ला म्हणाले, बीसीसीआय ही एक कॉर्पोरेट कंपनीप्रमाणेच कर भरते. आम्ही जीएसटीसुद्धा देतो. सरकारकडून आम्हाला कोणतीही सूट मिळत नाही. आम्ही दरवर्षी हजारो कोटी रुपये कररूपाने भरतो. राज्य क्रिकेट संघटनादेखील कर भरतात. सरकारकडून आम्हाला एक रुपयासुद्धा अनुदान मिळत नाही.
आमचा प्रयत्न फक्त इतकाच आहे की, स्टेडियम नेहमी भरलेले असावेत. महिला प्रेक्षकांनी देखील सामन्याला यायला हवे. आम्ही त्यासाठी सतत प्रयत्न करतो. महिला-पुरुष खेळाडूंना समान वेतन दिलं जातं.
ड्रीम 11 आणि बीसीसीआयमध्ये 2023 मध्ये करार झाला होता, जो मार्च 2026 पर्यंत चालणार होता. पण ऑगस्ट 2025 मध्ये हा करार संपुष्टात आला. कारण, ऑनलाईन गेमिंगवरील सुधारणांनंतर सर्व बेटिंग अॅप्सनी युजर्सकडून पैसे घेणं बंद केलं. त्यामुळे या कंपन्यांना मोठं नुकसान सहन करावं लागलं.
Comments are closed.