पाकिस्तानात जन्मलेल्या खेळाडूने केला सुनील गावसकर यांचा अपमान, म्हणाला….

भारताचे माजी खेळाडू सुनील गावस्कर यांनी पाकिस्तानी खेळाडूला विकत घेतल्यामुळे सनरायझर्स फ्रँचायझीला चांगलंच सुनावलं होतं. वृत्तपत्रातील आपल्या कॉलममध्ये सुनील गावस्कर यांनी सनरायझर्स लीड्स फ्रँचायझीने नुकत्याच झालेल्या लिलावात पाकिस्तानचा फिरकीपटू अबरार अहमद याला २.२३ कोटी खर्चून संघात घेतल्याच्या निर्णयावर भाष्य केलं होतं. सनरायझर्स ही फ्रँचायझी भारतीय मालकाची असल्याने गावस्करांनी टीका केली होती. यानंतर आता पाकिस्तानात जन्मलेल्या माजी खेळाडूने गावस्करांच्या या वक्तव्याविरूद्ध मोठं वक्तव्य केलं.
सनरायझर्स फ्रँचायझी ही चेन्नईस्थित सन टीव्ही नेटवर्क कंपनीच्या मालकी असून, हीच कंपनी आयपीएलमधील सनरायझर्स हैदराबादचीही मालक आहे. “द हंड्रेड स्पर्धेत भारतीय मालक असलेल्या फ्रँचायझीने पाकिस्तानी खेळाडूला संघात घेतल्याने निर्माण झालेला वाद आश्चर्यकारक नाही. नोव्हेंबर २००८ मधील मुंबई हल्ल्यांनंतर भारतीय फ्रँचायझींनी आयपीएलमध्ये पाकिस्तानी खेळाडूंना पूर्णपणे दुर्लक्षित केले आहे,” अस गावस्कर यांनी आपल्या कॉलममध्ये लिहिलं. यासोबतच पाकिस्तानच्या खेळाडूंना दिले जाणारे मानधन अप्रत्यक्षपणे त्या देशातील लष्करी कारवायांना हातभार लावू शकते, असेही गावस्कर यांनी नमूद केलं.
“उशिरा का होईना, पण आता हे लक्षात येत आहे की पाकिस्तानी खेळाडूंना दिलं जाणारं मानधन, जे पुढे ते आपल्या सरकारला कराच्या स्वरूपात देतात आणि त्यातून शस्त्रास्त्रांची खरेदी केली जाते, त्यामुळे अप्रत्यक्षपणे भारतीय सैनिक आणि नागरिकांच्या मृत्यूला हातभार लागतो. त्यामुळेच भारतीय संस्थांनी पाकिस्तानी कलाकार आणि खेळाडूंना संधी देण्याबाबतही आता टाळाटाळ करण्यास सुरुवात केली आहे. पेमेंट करणारी संस्था भारतातील असो किंवा तिची परदेशातील शाखा असो, मालक भारतीय असेल तर तो भारतीयांच्या हानीतच भर घालत आहे. हे इतकं सोपं आहे,” असं सुनील गावस्कर यांनी लिहिलं.
दरम्यान, गावस्कर यांच्या या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटली. कराचीमध्ये जन्मलेले माजी क्रिकेटपटू अजीम रफीक यांनी सोशल मीडियावरून या वक्तव्याचा निषेध केला. “हे वक्तव्य अतिशय वाईट आहे आणि याचा निषेध व्हायलाच हवा. अशी वक्तव्यं स्वीकारार्ह कशी असू शकतात? तुम्ही किती धावा केल्या याने मला काही फरक पडत नाही. गावस्कर यांच्याकडून आलेलं हे अतिशय घृणास्पद वक्तव्य आहे,” असं त्यांनी एक्सवर लिहिलं.
“गावस्कर यांनी कोणत्याही सामन्याचं (पाकिस्तानच्या) समालोचन करण्यावर बहिष्कार टाकला आहे का? बहुधा नाहीच…,” असं म्हणत त्यांनी दुसऱ्या पोस्टमध्ये टोला लगावला.
अबरारला संघात सामील करून घेतल्यानंतर, सनरायझर्स लीड्सचे मुख्य प्रशिक्षक डॅनियल व्हेटोरी यांनी सांगितलं होतं की, संघ व्यवस्थापनाने पाकिस्तानी खेळाडूंना न विकत घेण्याबद्दल कोणतीही चर्चा केली नव्हती. व्हेटोरी पुढे म्हणाले की, अनुभवी फिरकीपटू आदिल रशीदला संघात घेण्यात अपयशी ठरल्यानंतर फ्रँचायझीने निवडलेल्या काही मोजक्या खेळाडूंपैकी अबरार एक होता.
Comments are closed.