'जैश'चा एक पाकिस्तानी दहशतवादी मारला गेला आहे.
काश्मीरमधील कठुआ जिह्यात चकमक : शस्त्रास्त्रेही जप्त
मंडळ संस्था/श्रीनगर
जम्मू-काश्मीरमधील कठुआ जिह्यातील बिल्लावर भागात शुक्रवारी संध्याकाळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. भारतीय लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या विशेष ऑपरेशन ग्रुपच्या (एसओजी) संयुक्त कारवाईत जैश-ए-मोहम्मदचा एक दहशतवादी ठार झाला. मृत दहशतवाद्याची ओळख पटली असून त्याचे नाव उस्मान असे आहे. तो पाकिस्तानी नागरिक असल्याचे दस्तावेजही सापडले आहे. तसेच त्याच्याकडील शस्त्रास्त्रेही जप्त करण्यात आली आहेत. या चकमकीमुळे कठुआ जिल्ह्यात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.
जम्मू-काश्मीर पोलिसांच्या पथकाने बिल्लावर परिसरात लष्कर आणि सीआरपीएफच्या समन्वयाने मोठी मोहीम राबवली. सुरक्षा दलांनी जलदगतीने कारवाई करताना एका दहशतवाद्याचा खात्मा केला. परिसरात दहशतवादी असल्याच्या गुप्त माहितीच्या आधारे शोधमोहीम सुरू असताना दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यामुळे संघर्षाला प्रारंभ झाला. सुरक्षा दलाने केलेल्या गोळीबारात एका दहशतवाद्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले होते. यानंतरही परिसरात शोधमोहीम राबवून अन्य सहकाऱ्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू होता. या चकमकीमुळे सुरक्षा दलांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. काश्मीरच्या आयजीपींनी या मोहिमेची माहिती सोशल मीडियाद्वारे देत पाकिस्तानी दहशतवाद्याला ठार केल्याच्या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिला आहे.
Comments are closed.