देशभरात दहशत पसरवण्याचा डाव?

50 ठिकाणी बॉम्बची धमकी देणाऱ्यास पश्चिम बंगालमधून अटक

वृत्तसंस्था/ कोलकाता, मुंबई

देशभरातील विविध राज्यांमध्ये बॉम्बस्फोट घडवण्याच्या धमक्या पाठवून दहशत पसरवणाऱ्या पश्चिम बंगालमधील एका कुख्यात संशयिताला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. 28 वर्षीय सौरव विश्वास असे ओळख पटलेल्या या आरोपीला उत्तर 24 परगणा जिह्यातील न्यू बराकपूर परिसरातून अटक करण्यात आली. आरोपी सौरव विश्वास याने गेल्या पाच दिवसांत मुंबई, दिल्ली आणि गुजरातसह देशाच्या विविध भागांत 50 हून अधिक बॉम्ब हल्ल्याच्या धमक्यांचे ईमेल पाठवले होते. या धमक्यांमागील मुख्य उद्देश सुरक्षा यंत्रणांना चकवा देणे आणि सामान्य जनतेमध्ये घबराट निर्माण करणे हा होता, असा धक्कादायक खुलासा पोलिसांच्या तपासात झाला आहे.

अटक करण्यात आलेल्या सौरव विश्वास याने इंटरनेटद्वारे ईमेल पाठवून मुंबईतील प्रतिष्ठित शाळा, स्टॉक एक्स्चेंज, मुंबई मेट्रो स्टेशन आणि दिल्ली व गुजरातमधील महत्त्वाच्या आस्थापनांमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी दिली होती. धमकी मिळाल्यानंतर मुंबईतील दिंडोशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तांत्रिक विश्लेषण आणि ईमेल ट्रॅकिंगद्वारे पोलिसांनी आरोपीचे ठिकाण पश्चिम बंगालमध्ये शोधून काढले. तपासात त्याने अन्य अनेक ठिकाणीही ईमेल पाठवून बॉम्बस्फोट घडविण्याची धमकी दिल्याचे स्पष्ट झाले.

षड्यंत्राचा फज्जा?

अटक केलेल्या सौरव विश्वासची सध्या कसून चौकशी सुरू आहे. त्याने हे केवळ ‘सायबर उपद्रवा’साठी केले की यामागे एखादे मोठे दहशतवादी नेटवर्क किंवा मोठे षड्यंत्र आहे, हे पोलीस निश्चित करण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलीस सूत्रांनुसार, आरोपीने दहशत पसरवण्याच्या उद्देशाने इंटरनेटचा वापर केला. त्याची यापूर्वीची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि डिजिटल माहितीची जाण यासंबंधी सध्या सखोल चौकशी केली जात आहे.

Comments are closed.