३५ रुपये पगार अन् एकवेळचं जेवण; बिकट आर्थिक परिस्थितीमुळे नववीत असतानाच नाना पाटेकरांना करावी लागली होती नोकरी
संघर्षातून उभं राहून अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या जाण्याने केवळ एक हरहुन्नरी अभिनेता नव्हे, तर आपल्या माणुसकीने आणि सामाजिक कार्याने असंख्य मनांमध्ये स्थान निर्माण करणारा कलाकार काळाच्या पडद्याआड गेला आहे.
अभिनयाच्या क्षेत्रात आपल्या दमदार अभिनयाने वेगळी ओळख निर्माण करणारे नाना पाटेकर यांचा संघर्षाचा प्रवासही तितकाच प्रेरणादायी आहे. यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या नाना पाटेकरांना लहानपणी आर्थिक परिस्थितीशी मोठा संघर्ष करावा लागला होता. अवघ्या नववीत शिकत असतानाच त्यांनी कुटुंबाला हातभार लावण्यासाठी नोकरी करण्यास सुरुवात केली होती. सिनेमाच्या पोस्टर्सना रंग देणाऱ्या त्या हातांनी पुढे रुपेरी पडद्यावर अभिनयाचे असंख्य रंग उधळले.
नाना पाटेकर नववीत शिकत असताना त्यांच्या वडिलांचा व्यवसाय बंद पडला. घरची आर्थिक परिस्थिती बिकट झाल्यानंतर शिक्षणासोबतच त्यांना काम करावे लागले. या काळातील आठवण सांगताना नाना पाटेकर यांनी एका मुलाखतीत आपल्या संघर्षाची कहाणी सांगितली होती.
“मी नोकरी करू लागलो. शाळेतून दीड वाजता यायचो. काहीतरी खाऊन पुन्हा कामासाठी निघायचो. आठ किलोमीटर चालत जायचो आणि आठ किलोमीटर चालत परत यायचो,” असं नाना पाटेकर यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं. त्यावेळी ते सिनेमाचे पोस्टर्स रंगवण्याचं काम करत होते. या कामासाठी त्यांना महिन्याला अवघे 35 रुपये मिळायचे. विशेष म्हणजे, पगारासोबत त्यांना दिवसातून एक वेळचं जेवणही मिळत होतं. त्या दिवसांची आठवण सांगताना नाना पाटेकर यांनी आई-वडिलांची काळजीही व्यक्त केली होती. “संध्याकाळी जेवताना मला वाटायचं की आई-बाबांनी खाल्लं असेल का? पण मलाच इतकी भूक लागायची की मी सगळं खाऊन टाकायचो,” अशी हृदयस्पर्शी आठवण त्यांनी सांगितली होती.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून पुढे येत नाना पाटेकर यांनी अभिनयाच्या क्षेत्रात स्वतःचं स्थान निर्माण केलं. संघर्ष, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता.
Comments are closed.