गुजरातचे एक जहाज होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ बुडाले.

एका भारतीयाचा मृत्यू, 17 कर्मचाऱ्यांना वाचवले; दुबईहून येमेनला जाणारे जहाज

वृत्तसंस्था/ तेहरान, नवी दिल्ली

होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये शुक्रवारी रात्री इराण आणि अमेरिकेच्या नौदलांमध्ये झालेल्या गोळीबारात गुजरातचे एक मालवाहू जहाज बुडाले. हे जहाज गुजरातच्या द्वारका जिह्यातील सलाया येथील होते. या अपघातात इंजिन रूममध्ये काम करणारे भारतीय कर्मचारी अल्ताफ तलाब केर यांचा मृत्यू झाला, तर उर्वरित 17 कर्मचाऱ्यांना वाचवण्यात आले. इंडियन सेलिंग व्हेसल्स असोसिएशनचे सरचिटणीस आदम भाई यांनी ही माहिती दिली. यासंबंधी त्यांनी मदतीसाठी दुबईतील भारतीय दूतावासाला ईमेलही पाठवला. एमएसव्ही अल फैज नूर-ए-सुलेमानी-1 हे मालवाहू जहाज दुबईहून येमेनमधील मुकाला बंदराकडे माल घेऊन जात असताना हल्ला झाला. याप्रसंगी जहाजावर एका बंदूकधाऱ्यासह 18 खलाशी होते. पर्शियन आखात आणि ओमानचा आखात यांच्यातील एक महत्त्वाचा सागरी मार्ग असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्यामुळे याची गंभीरता वाढली आहे.

Comments are closed.