चहाचा एक घोट… पोट भरते

चहा हे पेय सर्वांच्या परिचयाचे आहे. ते जणू आपल्या संस्कृतीचाच एक भाग बनले आहे. घरी आलेल्या अतिथीचे चहाने स्वागत करणे, हे प्रत्येकाच्या अंगवळणी पडलेले असते. या दृष्टीने चहाचे महत्व असले तरी ते काही पोटभरीचे अन्न नव्हे. चहा जेवणाआधी किंवा जेवण झाल्यानंतर घेतला जातो. जेवणाऐवजी घेतला जात नाही. काही लोक दिवसाला आठ दहा कप किंवा त्याहूनही अधिक चहा पितात. पण त्यांनाही दिवसातून दोन तीनदा भोजन किंवा खाणे करावेच लागते.

तथापि, छत्तीसगड राज्याच्या कोरिया नामक जिल्ह्यातील बराडिया या ग्रामात वास्तव्य करणाऱ्या पिल्लीदेवी नामक महिलेसाठी चहा हेच भोजन आहे. याचा अर्थ असा की ही महिला गेली 30 हून अधिक वर्षे केवळ चहावर जगत आहे. ती इतर कोणताही आहार घेत नाही. वयाच्या 11 व्या वर्षी या महिलेने अन्नत्याग केला. तेव्हापासून आज तिच्या वयाच्या 44 वर्षांपर्यंत, अर्थात सलग 33 वर्षे तिने चहा सोडून इतर कोणताही पदार्थ तोंडात घेतलेला नाही. 11 वर्षाची असताना ती पाटणा येथे एका स्पर्धेत भाग घेण्यासाठी गेली होती. तेथून परतल्यावर तिने अन्नाचे नावच टाकले आणि केवळ चहा पिऊन जगू लागली, अशी माहिती तिचे कुटुंबिय देतात. प्रारंभी ती दूध घातलेला चहा पित होती. पण नंतर तिचे चहात दूध घालायचेही सोडून दिले. गेली कित्येक वर्षे ती केवळ काळा चहा किंवा कोरा चहा पीत आहे. तिच्या या प्रकारामुळे तिचे कुटुंबिय चक्रावून गेले होते. त्यांनी तिला डॉक्टरांकडे नेऊन उपचारही केले. पण काहीही उपयोग झाला नाही. डॉक्टरांनाही या प्रकाराचे आश्चर्य वाटते. वैद्यकीय शास्त्रालाही कोड्यात टाकणारी ही बाब आहे, अशी त्यांची प्रतिक्रिया आहे. कित्येकांना हा केवळ प्रसिद्धीसाठी केलेला बनाव वाटतो. पण हे सत्य आहे, हे सिद्ध झाले आहे. पिल्लीदेवी शिवभक्त आहे. ती आपला बव्हंशी काळ भगवान शंकराच्या पूजनात आणि भक्तीत व्यतीत करते. भगवान शंकरानेच तिला ही शक्ती दिली असावी, असे मानले जाते.

Comments are closed.