दिव्यात चाळीचा स्लॅब कोसळला; 10 जण बचावले

दिव्यात चाळीच्या गॅलरीचा भाग कोसळल्याची घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या दुर्घटनेदरम्यान चाळीच्या पहिल्या मजल्यावरील तीन घरांमध्ये राहणारे दहा रहिवासी अडकले होते. या घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन व अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत अडकलेल्या 10 जणांची सुखरूप सुटका केली, तर चाळीचा उर्वरित भाग धोकादायक स्थितीत असल्याने चाळीतील इतर 40 रहिवाशांना तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित करण्यात आले आहे.
दिव्याच्या गावदेवी मंदिराजवळील एन. आर. नगर परिसरात ही तळ अधिक एक मजली संजय म्हात्रे चाळ आहे. ही चाळ 20 वर्षे जुनी असून तिथे एकूण 40 सदनिका आहेत. दुर्घटनेदरम्यान पहिल्या मजल्यावरील गॅलरी खाली कोसळली. या घटनेची माहिती मिळताच बांधकाम विभाग, टोरंट पॉवर विभागाचे अधिकारी-कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्ष व अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत कोसळलेला भाग बाजूला केला. तसेच अडकलेल्या रहिवाशांचीही सुखरूप सुटका केली.
30 घरे रिकामी केली
गॅलरीचा भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत सुदैवाने कोणालाही दुखापत झालेली नाही. मात्र गॅलरीचा काही भाग अद्याप धोकादायक स्थितीत असल्याने बचाव पथकांनी सुरक्षेच्या दृष्टीने ही चाळ रिकामी केली आहे. चाळीतील 40 सदनिकांपैकी 30 सदनिकांमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना तात्पुरत्या स्वरूपात नातेवाईकांकडे राहण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
Comments are closed.