अमेरिकेसोबतचा एक रखडलेला व्यापार करार दृष्टीपथात आहे
अमेरिकन शिष्टमंडळ भारत दौऱ्यावर : बुधवारपासून तीन दिवस चालणार बैठक
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारत आणि अमेरिका यांच्यातील रखडलेला व्यापार करार लवकरच अंतिम होण्याची शक्यता आहे. अलिकडच्या काळात दोन्ही देशांकडून असे अनेक संकेत समोर आले आहेत. व्यापार करारासंबंधी वाटाघाटी योग्य मार्गावर सुरू असून लवकरच पूर्ण होतील, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या संबोधनांमध्ये सातत्याने सांगितले आहे. दरम्यान, भारतीय अधिकाऱ्यांकडूनही वाटाघाटी प्रगतीपथावर असल्याचे संकेत मिळत आहेत.
भारत-अमेरिका द्विपक्षीय व्यापार कराराच्या पहिल्या टप्प्याला अंतिम रूप देण्यासाठी अमेरिकन अधिकाऱ्यांची एक टीम भारताला भेट देणार आहे. येत्या बुधवारपासून सुरू होणाऱ्या बैठकीमुळे दोन्ही देशांमधील व्यापार करारात सुधारणा होऊन शिक्कामोर्तब होऊ शकेल अशी चर्चा सध्या सुरू आहे. अमेरिकेच्या प्रशासनाचे एक शिष्टमंडळ भारतात येत असून 10 डिसेंबर ते 12 डिसेंबर हे तीन दिवस बैठक चालणार आहे. अमेरिकेचे शिष्टमंडळ 9 डिसेंबरला रात्री भारतात येईल, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाच्या सूत्रांकडून देण्यात आली. या अमेरिकन प्रतिनिधीमंडळाचे नेतृत्व अमेरिकेच्या व्यापार विभागाचे उपप्रतिनिधी रिक स्टिटझर करणार आहेत.
भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापार करारासंबंधात गेले जवळपास 10 महिने चर्चा केली जात आहे. तथापि, अद्यापही करार दृष्टिपथात आलेला नाही. अमेरिकेने भारतावर 25 टक्के व्यापारी शुल्क आणि 25 टक्के अतिरिक्त शुल्क लागू केल्यानंतरची अमेरिकन प्रतिनिधीमंडळाची ही दुसरी भारतभेट होणार आहे. या भेटीत व्यापार करार चर्चा आणखी पुढे नेण्यात येईल, असे भारताच्या बाजूकडून स्पष्ट करण्यात आले आहे. काही मुद्द्यांवरील मतभेद दूर न झाल्याने कराराला अंतिम स्वरुप देण्यात विलंब लागत आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
भारताच्या व्यापार विभागाचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी या करारासंबंधात काही दिवसांपूर्वी सकारात्मक वक्तव्य केले आहे. त्यानुसार, या वर्षाच्या अखेरपर्यंत व्यापार कराराची रुपरेषा निर्धारित करण्यात यश मिळणार आहे. संपूर्ण व्यापार करार एकदम न करता तो टप्प्याटप्प्याने करण्याच्या दृष्टीने हालचाली केल्या जात आहेत. कराराच्या प्रथम टप्प्यात काही महत्वाच्या वस्तू आणि सेवा यांचा समावेश असण्याची शक्यता आहे. तसेच अमेरिकेने भारतावरचे कर कमी करावेत, या दृष्टीनेही प्रयत्न भारताच्या बाजूकडून केला जाणार आहे.
Comments are closed.