ट्विटमधील एका व्हिडीओने मिंधे गट बावचळला! अंबादास दानवे यांचा पुन्हा निशाणा

लाल टी-शर्ट घातलेल्या व्यक्तीसमोर पैशांच्या बंडलांची रास पडलीय, असा व्हिडीओ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते अंबादास दानवे यांनी ‘एक्स’वर पोस्ट केला. ‘हा आमदार कोण आहे, पैशांच्या गड्डय़ांसह तो काय करतोय’, असा सवाल त्यांनी या पोस्टमधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला. दानवे यांनी कुणाचेही नाव घेतले नाही, मात्र या ‘मनीबॉम्ब’ने शिंदे गटाचे अलिबागचे आमदार महेंद्र दळवी घायाळ झाले. हा मॉर्फ व्हिडीओ आहे, माझा काही संबंध नाही, असे सांगत त्यांनी आगपाखड केली. शिवसेनेच्या या मनीबॉम्बने हिवाळी अधिवेशनात कडाक्याच्या थंडीत वातावरण चांगलेच तापले. विधिमंडळातही याचे पडसाद उमटले. राज्य सरकारने या प्रकरणाची चौकशी करत सोक्षमोक्ष लावावा, अशी मागणीही अंबादास दानवे यांनी केली.

कालच्या व्हिडीओमुळे मिंधे गट बावचळला आहे. हिंदीत त्याला बौखलाहट असा शब्द आहे. या व्हिडीओचा तपास व्हावा, अशी आपण पुन्हा मागणी करत आहोत. राज्य सरकारने तपासाला सुरुवात केली तर त्याला आपण पूर्ण सहकार्य करू, असेही ते म्हणाले. त्यामुळे सत्ताधारी किंवा सरकारने या प्रकरणापासून पळ काढू नये, याचा तपास करून सोक्षमोक्षा लावला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

आपण सगळे राष्ट्रभक्त आणि देशभक्त आहोत. त्यामुळे कोणवरही संशय घेण्याचे कारण नाही. कोणाच्याही देशभक्ती किंवा राष्ट्रभक्तीवर शंका घेण्याचे कारण नाही. मला ज्यांनी व्हिडीओ दिला, त्यांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. मात्र, यात राजकीय वाद किंवा यासारखी कारणे यात नाही.दानवे यांना तो व्हिडीओ सुनील तटकरे यांनी पुरवल्याचा आरोप आमदार दळवी यांनी केला होता. त्यावर आपले तटकरे यांच्याशी सध्या बोलणेही होत नाही, असे दानवे म्हणाले. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी आपली मागणी असल्याचही अंबादास दानवे म्हणाले.

अंबादास दानवे यांनी एका व्हिडीओ कॉलचा संदर्भ देत तीन व्हिडीओ पोस्ट केले आहेत. त्यातील एक व्हिडीओ 11 सेकंदाचा तर दुसरा व्हिडीओ 6 सेकंदाचा आहे. लाल टी-शर्ट घातलेली व्यक्ती नोटांच्या बंडलांसोबत बसलीय आणि बंडलं मोजतेय, असे व्हिडीओत स्पष्टपणे दिसत आहे. व्हिडीओत या व्यक्तीचा चेहरा मात्र दिसत नाही. ‘या सरकारकडे फक्त शेतकरी कर्जमाफीला पैसा नाही.. बाकी सगळं ओक्के आहे! जनतेला जरा सांगा मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदे जी, हे आमदार कोण आहेत आणि पैशांच्या गड्डय़ांसह काय करत आहेत?’ असा सवाल दानवे यांनी आपल्या पोस्टमधून विचारला आहे.

Comments are closed.