फटाके न फोडणारे गाव

दीपावली या सणाला फटके उडविण्याची प्रथा आहे. या प्रथेचा प्रारंभ नेमका कधी झाला, हे अज्ञात आहे. फटाके मर्यादित प्रमाणात वाजविल्यास ते आनंददायी ठरतात. पण त्यांचे अतिप्रमाण वायू प्रदूषणाला कारणीभूत ठरते, असे मानले जाते. त्यामुळे अनेकांचे मत फटाके उडवू नयेत असे असते. अर्थात, या मताला विरोधही केला जातो. फटाक्यांपेक्षाही अधिक प्रदूषण अन्य कारणांमुळे होत असते. पण फटाक्यांना विरोध करणारे लोक याकडे सरसकट दुर्लक्ष करतात, असाही आरोप केला जातो. प्रत्येक गणपती, दिवाळीला फटाक्यांचा वादही चांगलाच वाजविला जातो. तरीही, दीपावलीला फटाके उडविले जात नाहीत, असे स्थान भारतात तरी सापडणे कठीण आहे. मात्र, तामिळनाडूतील एक गाव असे आहे की जिथे दिवाळीला एकही फटाका वाजविला जात नाही. गेल्या 100 वर्षांपासून या गावाने हा नियम पाळला आहे. फटाके न उडविता या गावातील लोक दीपप्रज्वलन करुन आणि पूजाआर्चा करुन दीपावली साजरी करतात. या गावातील लोक फटाके का उडवत नाहीत, याचे कारणही पर्यावरणाशी निगडीत आहे. तामिळनाडू राज्याच्या मयिलाथुदुराई जिल्ह्यात हे गाव असून त्याचे नाव पेराम्बूर असे आहे.

हे गाव फटाके का उडवत नाही, याचे कारण या गावातील विशिष्ट प्रकारच्या झाडावर वास्तव्य करणारी वटवाघळे हे आहे. हे झाड 150 वर्षे जुने आहे. त्यावर शेकडो वटवाघळे वास्तव्य करतात. या वटवाघळांना ‘इंडियन फ्लाईंग फॉक्स’ असे नाव आहे. ही आकाराने बरीच मोठी असतात आणि त्यांची उपजिवीका फळांवर चालते. या वटवाघळांना मोठा ध्वनी किंवा धूर सहन होत नाही. परिणामी, त्यांना त्रास होऊ नये, म्हणून या गावातील लोक कधीच फटाके वाजवत नाहीत. या वटवाघळांचे संरक्षण व्हावे आणि त्यांना त्रास होऊ नये, म्हणून या गावातील लोक फटाके उडविण्याच्या आनंदापासून स्वेच्छेने वंचित राहतात. या ग्रामस्थांच्या या वन्यप्राणीप्रेमाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. गावकऱ्यांची मोठी प्रशंसा होत आहे.

Comments are closed.