मलेशियात जाण्यासाठी लागणार आता व्हिसा; नव्या वर्षापासून नवा नियम लागू, 1 डिसेंबरपासून अर्ज करता येणार

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

केंद्रातील मोदी सरकारला मलेशिया सरकारने जोरदार झटका दिला आहे. मलेशिया सरकारने हिंदुस्थानी नागरिकांना दिलेली व्हिसामुक्त प्रवेशाची सुविधा 1 जानेवारी 2027 पासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मलेशियात जाणाऱया हिंदुस्थानी नागरिकांना प्रवासापूर्वी वैध व्हिसा घेणे बंधनकारक असणार आहे.

हिंदुस्थानी पासपोर्ट धारकांना यापुढे व्हिसाशिवाय मलेशियात प्रवेश करता येणार नाही. नव्या नियमाच्या अंमलबजावणीपूर्वी त्यांना 1 डिसेंबर 2026 पासून माय व्हिसा या ऑनलाईन पोर्टलवर व्हिसासाठी अर्ज करता येणार आहे. 1 जानेवारी 2027 पासून व्हिसामुक्त प्रवेशाची सुविधा बंद होणार असल्याने त्यानंतर प्रवास करणाऱयांनी आधीच व्हिसा मिळवणे आवश्यक आहे. प्रवासाचे नियोजन करताना नव्या नियमाची दखल घेण्याचे आवाहन स्थलांतर विभागाने केले आहे. मलेशियाने व्हिसा अर्जांच्या प्रक्रियेत आणखी एक बदल केला गेला आहे. अर्ज ‘न्यू ऑप्लिकेशन’ किंवा ‘पेंडिंग पेमेंट’ या स्थितीत कामकाजाच्या सात दिवसांपेक्षा अधिक काळ प्रलंबित राहिल्यास तो आपोआप कालबाह्य होणार आहे. हा नियम 1 ऑक्टोबर 2026 पासून लागू करण्यात आला आहे. 1 सप्टेंबर 2026 पूर्वी सादर केलेल्या अर्जांनाही हा नियम लागू असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे. एखादा व्हिसा अर्ज मुदत संपल्याने रद्द झाल्यास प्रवाशाला नव्या फॉर्मचा वापर करून पुन्हा अर्ज करावा लागेल. त्यामुळे अर्ज भरल्यानंतर सर्व आवश्यक माहिती आणि शुल्काची प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे गरजेचे आहे.

व्हिसा नाकारल्यास शुल्क वाया

व्हिसा अर्जासाठी भरलेले प्रक्रिया शुल्क परत मिळणार नसल्याचे मलेशियाच्या स्थलांतर विभागाने स्पष्ट केले आहे. अर्ज मंजूर झाला किंवा नाकारला तरी शुल्क परत केले जाणार नाही. व्हिसा धोरणात बदल झाला किंवा प्रवासाचा बेत रद्द केला तरीही भरलेले शुल्क परत मिळणार नाही. प्रवेशाच्या अटींमध्ये कधीही बदल करण्याचा बरोबर विभागाने राखून ठेवला आहे.

Comments are closed.