संसदेत 'शब्दांचे युद्ध' होईल.
‘ऑपरेशन सिंदूर’वर आज लोकसभेत चर्चेला सुरुवात : दोन्ही सभागृहात प्रत्येकी 16 तास चर्चा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सोमवार आणि मंगळवार असे सलग दोन दिवस ‘ऑपरेशन सिंदूर’वर चर्चा होणार आहे. पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात चालविलेल्या ‘सिंदूर अभियाना’संबंधी संसदेच्या दोन्ही सभागृहांमधील विस्तृत चर्चेच्या माध्यमातून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये ‘शब्दयुद्ध’ रंगणार आहे. सोमवारी लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवर 16 तासांची चर्चा सुरू होईल. रात्री उशिरापर्यंत सलग ही चर्चा सुरू राहील. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील या चर्चेत सहभागी होण्याची शक्यता आहे. या चर्चेत दोन्ही बाजू एकमेकांवर कुरघोडी करून राजकीय हेतू साध्य करण्याचा प्रयत्न करू शकतात.
गेल्या आठवड्यात संसदेतील चर्चेचा कार्यक्रम अधिकृतरित्या घोषित करण्यात आला होता. लोकसभेत ही चर्चा सोमवार, 28 जुलै या दिवशी, तर राज्यसभेत मंगळवार, 29 जुलै या दिवशी होईल. दोन्ही सभागृहांमध्ये या चर्चेसाठी प्रत्येकी 16 तासांचा वेळ निर्धारित करण्यात आला आहे. सरकारने संसदेत या महत्त्वाच्या मुद्द्यावर पूर्ण तयारी केली आहे. यापूर्वी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या चर्चेसाठी संरक्षण प्रमुख (सीडीएस) जनरल अनिल चौहान, संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह आणि तिन्ही सेनादलांच्या प्रमुखांसोबत अनेक बैठका केल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गृहमंत्री अमित शाह, परराष्ट्रमंत्री एस जयशंकर, भाजप खासदार अनुराग ठाकूर आणि निशिकांत दुबे हे देखील चर्चेत सहभागी होतील.
सरकार ही चर्चा पूर्ण आक्रमकतेने करण्याची तयारी करत आहे. विशेष म्हणजे ही चर्चा कारगिल विजय दिवस (26 जुलै) नंतर लगेच होत असल्यामुळे सरकार ते ‘विजय दिवस’ म्हणून सादर करण्याची तयारी करत आहे. पंतप्रधान मोदींनी यापूर्वीच ऑपरेशन सिंदूरचे वर्णन ‘विजय उत्सव’ असे केले आहे. ऑपरेशन सिंदूर 7 मे रोजी सुरू करण्यात आले होते. ही कारवाई जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्याने चालवलेली लष्करी कारवाई होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या कारवाईचे वर्णन ‘विजय उत्सव’ असे करत ते भारताच्या स्वदेशी संरक्षण क्षमतेचा पुरावा असल्याचे म्हटले आहे. सरकारी अहवालांनुसार, ऑपरेशन सिंदूर अवघ्या 22 मिनिटांत पूर्ण केल्यानंतर त्यात सर्व दहशतवाद्यांचा यशस्वीपणे खात्मा करण्यात आला. हे 100 टक्के यशस्वी ऑपरेशन असल्याचे वर्णन मंत्रीमहोदय आणि सेनाधिकाऱ्यांकडून वेळोवेळी करण्यात आले आहे.
बुधवारी संसदेच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडली. या बैठकीत सर्वानुमते चर्चेचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला. याच मुद्द्यावर संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचे आतापर्यंतच दिवस वाया गेले आहेत. विरोधी पक्षांनी दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गोंधळ आणि गदारोळ माजविल्याने कामकाज स्थगित करावे लागले आहे.
विरोधकांना सरकारकडून ठोस उत्तराची अपेक्षा
ऑपरेशन सिंदूरच्या मुद्द्यावरही विरोधी पक्ष सरकारकडून उत्तरे मागत आहे. यापूर्वी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सरकारच्या कृतीवर प्रश्न उपस्थित केले होते. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष आपणच थांबविला, असे प्रतिपादन आतापर्यंत 26 हून अधिकवेळा केले आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेत्यांनी हा मुद्दा बनविला आहे. सभागृहांमध्येही विरोधकांनी या मुद्द्यावर जोर दिला आहे. केंद्र सरकारने अनेकदा ट्रम्प यांच्या विधानाचा प्रतिवाद केला असून पाकिस्तानने विनंती केल्यामुळेच आम्ही त्या देशावरील हल्ले थांबविले, असे स्पष्ट केले आहे. तसेच, ‘सिंदूर अभियान’ थांबविण्यात आलेले नाही. ते केवळ स्थगित करण्यात आलेले आहे, असेही केंद्र सरकारकडून अनेकदा प्रतिपादन करण्यात आलेले आहे.
सत्ताधाऱ्यांचा प्रतिवार
काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष ‘सिंदूर अभियान’ भारताने मिळविलेल्या देदिप्यमान यशासंबंधी संशय निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. ते पाकिस्तानची भाषा बोलत आहेत. आपल्या देशाच्या सेनादलांच्या पराक्रमावर त्यांचा विश्वास नाही. त्यामुळे ते संभ्रम निर्माण करणारी विधाने करीत आहेत. विरोधी पक्ष नेत्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे पाकिस्तानला बळ मिळत आहे. भारताने हे अभियान, काश्मीर प्रश्न आणि इतर संबंधित मुद्द्यांवर आपली भूमिका सातत्यपूर्ण रितीने नेहमी स्पष्ट केली आहे. तथापि, विरोधी पक्षांच्या भारताच्या व्यवस्थांवर विश्वास नसून भ्रम फैलावणाऱ्या विदेशी शक्तींना पाठबळ देण्याचे काम विरोधी पक्ष करीत आहेत, असा पलटवार सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे. संसदेत या विषयावरील चर्चेत या सर्व आरोप-प्रत्यारोपांचा पुनरुच्चार होणार असल्याने शाब्दिक युद्ध रंगण्याची चिन्हे दिसत आहेत.
Comments are closed.