दुबार मतदानासाठी आधार कार्डाचा वापर, रोहित पवारांनी दाखवलं प्रात्यक्षिक

राज्यात दुबार मतदानासाठी आधार कार्डचा वापर होतो असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला. इतकंच नाही तर बोगस आधार कार्ड बनवून ते कसे वापरले जातात त्याचे प्रात्यक्षिकही रोहित पवार यांनी आज पत्रकार परिषदेत दाखवले.
राज्यभरातील मतदार याद्यांमधील घोळ, अवैध पद्धतीने मतदारांची झालेली वाढ व दुबार नावं या सर्व तांत्रिक बाबी आणि विशेषत: कर्जत- जामखेड विधानसभा मतदारसंघात मतदारांची झालेली शंकास्पद वाढीचा PPT च्या माध्यमातून आमदार रोहित पवार यांनी उलगडा केला. तसेच राज्यासह केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणालीवर पुराव्यांसहित त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. भारतीय निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था असतानाही भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी देवांग दवे यांच्याकडे आयोगाच्या वेबसाईटचे नियंत्रण आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचा आयोगावर विश्वास राहिलेला नाही, असेदेखील त्यांनी आवर्जून अधोरेखित केले.
सोबतच, काही लिंक्सच्या आधारे बनावट आधार कार्ड कशाप्रकारे तयार करता येतात? हे देखील रोहित पवार यांनी प्रत्यक्षात करून दाखवले. प्रायोगिक तत्वावर त्यांनी थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाचे आधार कार्ड काही सेकंदांतच तयार करून दाखवले. लोकशाहीचा गळा दाबला जाणार असेल तर, ते आम्हाला मान्य नाही. मतदार याद्यांमध्ये जर असे घोळ असतील तर निवडणुका कशासाठी घेता? असा संतप्त सवालही त्यांनी निवडणूक आयोगापुढे उपस्थित केला. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात मतांची चोरी झाली आहे व हा विषय राज्यभरातील जनतेला पटवून देण्यासाठी आम्ही भविष्यात काम करणार असल्याचंही रोहित पवार यांनी सांगितले.
Comments are closed.